दिनेश आंबेकर
तालुका प्रतिनिधि जव्हार
जव्हार : आदिवासी कला व संस्कृती, हस्तकला यांची ओळख पर्यटकांना होऊन या कलेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी , भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील आदिवासी व्यक्तिमत्व “धरती आबा” भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधत शहरातील राजीव गांधी स्टेडियम या ठिकाणी पर्यटन संचालनालय , कोकण विभाग नवी मुंबई ” यांच्या विद्यमाने आदिवासी कला व संस्कृती व पर्यटन महोत्सव २०२३” दि – १८ व १९ नोव्हेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे.या महोत्सवात येथील आदिवासी संस्कृती, प्रस्तुत करताना आदिवासी नृत्य कला, स्थानिक हस्तकला, विविध वस्तूचे प्रदर्शन, स्थानीक खाद्यपदार्थांचे स्टॉल ,रानभाज्या, औषधी वनस्पती, फोटोग्राफी गॅलरी, वारली कला, बांबू कला विषयी कार्यशाळा, वारली पेंटिंग, पेपर मेसी वस्तू चे प्रदर्शन, बांबू उत्पादन, पारंपरिक वेशभूषा, जंगल भ्रमंती अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या पालघर व ठाणे आणि मुंबई सारख्या महानगरातून इच्छुकांनी हजेरी लावली. या वेळी अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, पोलीस उप विभागीय अधिकारी शैलेश काळे, मुख्याधिकारी मानिनी कांबळे, तहसीलदार गावित, घांगळी वादक सोनू म्हसे , तारपा वादक भिक्या धिंडा आणि सातवी इयत्तेतला छोटा तारपा वादक धिंडे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन करण्यात गणेश कनगरे, मनोज कामडी, वैभव घोलप, महिला बचत गट, ढोल नाच, नृत्य पथक आदींनी मेहनत घेतली. जव्हार सारख्या आदिवासी संस्कृती लाभलेल्या भागात पर्यटन स्थळे , येथील स्थानिक कलाकारांच्या विविध कलेचे रुप जग भरात प्रसिद्ध होऊन या भागात रोजगार उपलब्ध व्हावा, जेणे करून या भागातील स्थलांतर रोखणे शक्य होईल व पर्यटन वृध्दी होऊन विकास नांदेल.हनुमंत हेडे , उपसंचालक, पर्यटन कोकण विभाग मी स्वतः आदिवासी समाजाचा असून आमच्या कला व वस्तूंना अश्या प्रकारच्या महोत्सवातून अर्थार्जन मिळणार असल्याने अतिशय चांगल्या प्रकारे हा उपक्रम योजिला आहे, यातून कलेला चालना मिळून रोजगार निर्माण होऊ शकेल.
(सचिन दामोदर शिंगडा, आदिवासी नेता.)