दिनेश आंबेकर
तालुका प्रतिनिधी जव्हार
जव्हार : गेल्या दोन वर्षांपूर्वी केंद्र शासनाने १५ नोव्हेंबर हा क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या दिवशी ‘आदिवासी गौरव दिन’ म्हणून घोषित केला होता.या वर्षीच्या गौरव दिनी जव्हार मध्ये आदिवासी बांधवांनी पारंपारिक संस्कृतीचे दर्शन घडवत मोठ्या थाटात हा दिन साजरा केला.जनजाती विकास मंच,जव्हार मार्फत आयोजित केलेल्या या कार्यक्रमात शेकडो आदिवासी बांधवांनी आपली परंपरा कायम राखत आपल्या पारंपारिक वेशभूषेत सक्रिय सहभाग नोंदवला.शहरातील हनुमान पॉईंट पासून सुरु झालेली शोभायात्रेत पारंपारिक वादकांनी जव्हार नगरी दुमदुमून गेल्याचे चित्र निर्माण झाले होते.या शोभायात्रेत बिरसा मुंडांच्या प्रतिकृतीत १०० मुलांनी वेशभूषेत सहभागी होत विशेष आकर्षण निर्माण केले होते.आदिवासी बांधवांनी आपली पारंपारिक वाद्य असलेली घांगळी,डाकवादक,ठाळगाना,सांबळ,कांबडनाच,तुरनाच,तारपावाद्य,जागरण,बोहाडा मंडळ,बहरमकाठी,गणपती मंडळ सहभागी झाले होते तर ग्रामीण भागातील गावकारभारात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तालुक्यातील तमाम काठ्यांना निमंत्रित करून त्यांचाही अनोखा सन्मान करण्यात आला तसेच सध्याच्या आधुनिकतेच्या युगात काहीशा दुर्लक्षित झालेल्या ग्रामीण भागातील सुयेरीन,धवळेरीन व सवासीन यांचाही विशेष सन्मान करून लोप पावत चाललेली आदिवासी संस्कृती पुनर्जीवित करण्याचे काम जनजाती विकास मंचांनी आपल्या माध्यमातून केले आहे.सकाळी दहाच्या सुमारास हनुमान पॉईंट पासून सुरू झालेली शोभायात्रा ही जव्हारचे श्रीमंत राजे मुकणे महाराज चौक,तारपा चौक,गांधी चौक,आंबेडकर चौक,विजयस्तंभ आणि आदिवासी क्रांतिवीर चौक येथे समारोप करून पुढे राजीव गांधी क्रीडा संकुल येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते.या सभेचे प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित असलेले डॉ.प्रकाश गेडाम यांनी उपस्थित आदिवासी बांधवांना संबोधित करताना आदिवासी बांधवांचे होणाऱ्या धर्मांतरावर काळजी व्यक्त करत हे धर्मांतरण थांबले पाहिजे असे त्यांनी सांगितले.प्रमुख अतिथी म्हणून जननायक म्हणून ओळखले जाणारे चैत्राम पवार तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जनजाती विकास मंचाचे पालघर जिल्हाध्यक्ष छगन वावरे विराजमान होते.या गौरव दिनाच्या कार्यक्रमाचे नियोजन हे जनजाती विकास मंचाचे कार्यकर्ते व महिला आघाडी कडून करण्यात आले होते.


