प्रमोद डफळ
शहर प्रतिनिधी राहुरी
राहुरी: ‘कुंभारासारखा गुरू नाही रे जगात, वर घालतो धपाटा आत आधाराचा हात’ या विचाराने प्रेरीत होऊन गुरू-शिष्य परंपरेला उजाळा देणारा आगळा वेगळा उपक्रम राहुरी शहरात राबविण्यात आला. दिवाळी सणा निमित्त एकत्र आलेल्या गुरू-शिष्यांनी नात्यातला स्नेह जपताना या वेळी जुन्या आठवणी जागविल्या. राहुरी येथील प्रगती विद्यालय शाळेतील २००० च्या दहावीच्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी प्रथमच पुढाकार घेऊन दि. १४ नोव्हेंबर रोजी हा एकत्र येण्याचा कार्यक्रम राबविला. राहुरी – अहमदनगर सह इतरत्र विखुरल्या गेलेल्या व सध्या निवृत्तीचे जीवन जगणाऱ्या शिक्षकांचा या वेळी सन्मान करण्यात आला. त्यानंतर सर्व शिक्षकानी आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी आप आपला परिचय करून दिला व आपण करत असलेल्या व्यवसायाबद्दल नोकरीबद्दल समाजकार्याबद्दल माहिती दिली. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला व मनसोक्त गप्पा मारत एकमेकांचे सुखदुःख वाटून घेत शालेय जीवनातील आनंद पुन्हा अनुभवला त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी अल्पोपहार चहा नाश्त्याचा आस्वाद घेतला व एकमेकांच्या गाठीभेटी घेऊन सर्व शिक्षक विद्यार्थी यांनी पुन्हा भेटण्याचे आश्वासन देऊन व असे कार्यक्रम आपण पुन्हा राबवावे व त्यातून काही नवीन करता येईल का एकत्र येऊन एकमेकास मदत करता येईल का याबद्दल चर्चा केली.
सर्व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आम्हाला तुम्हाला सर्वांना बघून खूप आनंद झाला असून तुम्ही खूप दिवसांनी आम्हा सर्व शिक्षकांना एकत्र तसेच सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित आणून भेटी घालून दिल्यात त्याबद्दल आयोजकांचे कौतुक करण्यात आले व सर्व विद्यार्थी हे आपल्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये कुठे ना कुठे चांगल्या पदावर आहेत हे पाहून सर्व शिक्षक आनंदित झाले तसेच मुलांनी आपल्या शरीराची आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देखील शिक्षकांकडून देण्यात आला व विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांना चांगल्या प्रकारे सांभाळ करण्याचा सल्ला दिला व आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार करा व त्यांना चांगले शिक्षण द्या. असे सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्याना सांगितले.
या कार्यक्रमासाठी पवार सर, गुणे सर, शिंदे सर, शिरसाठ सर, पानसंबळ सर, गावडे सर, वाखारे सर, सोलाट सर, ठाकरे सर, तनपुरे सर, श्रीमती झावरे मॅडम, घोलप मॅडम, जगताप मॅडम माजी शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते. विशाल तनपुरे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले. राहुरी सह इतर ठिकाणांहून निवृत्त शिक्षक, माजी विद्यार्थी उपस्थित होते.