अयनुद्दीन सोलंकी
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी, 10 नोव्हेंबर :- घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा येथील ग्रामसेवक प्रभुदास भगत हे नियमानुसार ग्रामपंचायतचे कामें करत नसुन स्वमर्जीने कामें करत असल्याने भगत यांची तात्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अब्दुल रफीक अब्दुल मजीद पाटील यांनी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी महेश ढोले यांचे कडे केली आहे. निवेदन देतांना अब्दुल रफीक पाटील यांचे सोबत दि. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा पांढरकवडा बॅकेचे विभागीय अध्यक्ष, पार्डी (नस्करी) जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आशिष सुरेशबाबू लोणकर, घाटंजी पंचायत समितीचे माजी सभापती रुपेश कल्यमवार आदीं उपस्थित होते.
घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा येथील ग्रामपंचायत मध्ये प्रभुदास भगत हे ग्रामसेवक म्हणून 2/3 वर्षांपासून कार्यरत आहे. मात्र, ग्रामपंचायत सचिव हे नियमानुसार शासकीय कामें करत नसुन स्वमर्जीने ग्रामपंचायतची कामें करत असल्याचा आरोप अब्दुल रफीक पाटील यांनी आपल्या लेखी तक्रारीत नमुद केला आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतच्या अधिकारात असलेल्या कामाबाबत विचारणा केली असता, सचिव हे माहीती देण्यास टाळाटाळ करीत असुन माझी चिखलवर्धा येथुन बदली करुन द्या, अशी भाषा वापरतात, असेही तक्रारीत नमूद आहे. चिखलवर्धा ग्रामपंचायत हे पेसा योजना अंतर्गत येत असुन या ग्रामपंचायतीला अतिरिक्त निधी प्राप्त होत असते. तसेच मासीक सभा असो वा ग्रामसभा असो, चिखलवर्धा ग्रामपंचायतीला आत्तापावेतो किती निधी आला या बाबतची माहिती विचारली असता माहीती देण्यास सचिवाकडुन टाळाटाळ करण्यात येते, असा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे चिखलवर्धा ग्रामपंचायत मध्ये वाद उपस्थित होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने चिखलवर्धा येथील ग्रामसेवक प्रभुदास भगत यांची तात्काळ बदली करुन त्यांचे जागेवर ताडसावळी येथील ग्रामसेवक टाके यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी अब्दुल रफीक पाटील यांनी शासनाकडे केली आहे.
दरम्यान, चिखलवर्धा येथील ग्रामसेवक प्रभुदास भगत यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी 5 वेळा भ्रमणध्वनी वरुन संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी आपला भ्रमणध्वनी उचलला नाही. तसेच कोणताही प्रतिसाद दिला नाही व माहिती देण्यास टाळाटाळ केली.