अयनुद्दीन सोलंकी
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी, 4 नोव्हेंबर :- घाटंजी तालुक्यातील, घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अभिषेक ठाकरे (रा. आमडी), संचालक आशिष लोणकर (रा. शिरोली), गुणवंत लेनगुरे (रा. मानोली), आशिष भोयर (रा. अंजी (नृसिंह)), कैलास कोरवते (रा. शिरोली), अकबर तंवर (रा. घाटंजी), अरविंद जाधव (रा. घाटंजी) व रमेश डंभारे (रा. आमडी) आदींनी जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्राधिकृत अधिकारी एस. व्ही. कुडमेथे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नितीन अशोक कोठारी (रा. भांबोरा) व उपसभापती सचिन देशमुख पारवेकर (रा. पारवा) विरुद्ध विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांचे कडे अपील दाखल केले होते. मात्र, दाखल केलेले अपील महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम 1963 चे कलम 22 (4) अन्वये विभागीय सहनिबंधक सहकारी संस्थेचे (अमरावती) व्ही. डी. कहाळेकर यांनी गुरुवारी खारीज केले. प्रतिवादी नितीन कोठारी व सचिन देशमुख पारवेकर तर्फे ॲड. एस. एन. गट्टानी (अमरावती) यांनी काम पाहिले.
या पुर्वी महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) 1963 चे कलम 22 (4) अन्वये यवतमाळचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक अभिषेक ठाकरे व इतरांचे अपील 8 जुन 2023 रोजी फेटाळले होते. सदर निकालाच्या विरोधात व्यथित होऊन 9 जुन 2023 रोजी अमरावती येथील विभागीय सहनिबंधक सहकारी संस्थेकडे अपील दाखल करण्यात आले. या प्रकरणात प्रतिवादी तर्फे ॲड. एस. एन. गट्टानी यांनी वकीलपत्र दाखल केले होते. सदर प्रकरणात वेळोवेळी सुनावणी घेण्यात आली. अपील क्रमांक 6/2023 व अपील क्रमांक 7/2023 प्रकरणातील मुद्दे सारखेच असल्याने सदर प्रकरणात एकत्रित आदेश पारित करण्यात आला. बाजार समितीची उपविधी 41 (1) नुसार कोणत्याही तीन सदस्यांनी मागणी केल्यास गुप्त मतदान घेता येते. तसेच वरिल बाबी लक्षात घेऊन अपीलार्थीचे अपील मान्य करता येणार नाही. त्यामुळे सदरचे अपील महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) 1963 चे कलम 22 (4) अन्वये झालेल्या प्राप्त अधिकारानुसार अपीलार्थी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक अभिषेक शंकरराव ठाकरे व इतर संचालकांचे अपील विभागीय सहनिबंधक सहकारी संस्थेचे (अमरावती) व्ही. डी. कहाळेकर यांनी खारीज केले आहे. या निकालामुळे घाटंजी तालुक्यातील कृषी क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे.