दिनेश आंबेकर
तालुका प्रतिनिधी जव्हार
जव्हार : आदिवासी बहुल असलेल्या पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड,तलासरी, वाडा आदी ग्रामीण भागात आज ही पारंपरिक रिती रिवाज व पिढी जात परंपराचे जतन केले जात आहे. आधुनिकतेच्या काळात सर्वत्र टोले जंग इमारती, आलिशान घरांना संगमरवरी, रंगी बेरंगी फरशी, मार्बल स्टाईलचे जंगल जगभर निर्माण झालेले असतानाही जव्हार, मोखाड्यासारख्या आदिवासी बहुल भागात आजही दिवाळी सण सुरू व्हायच्या अगोदर या भागातील महिला, नागरिक आपल्या घरात आणि घराबाहेरील मोकळे अंगण मुरुमाच्या साह्याने चोपून शेणामातीने सारवून घेतात.आदिवासी भागातील रोजगार आणि उपजिविकेचे दुर्भिषण बघता कुटूंबाच्या दोनवेळच्या पुरेशा उदरनिर्वाहाची मारामारी असणाऱ्या बहुसंख्य आदिवासी कुटूंबाची घरे व घरासमोरील अंगणातील मोकळी जागा आज ही मुरुमाने चोपल्यानंतर शेणाने सारवली जाते. गावालगत असलेला मुरुम खड्डेदार चिकट माती आणल्यानंतर पूर्वीच्या मातीच्या भरावाचे वरवर खोदकाम करुन त्याच्यावर पुरेपूर पाणी टाकले जाते. एकदा का पूर्वीचा मुरुम चिंब भिजला की त्याच्यावरुन नवीन मुरुमांचा पसारा दिला जातो. यानंतर लाकडापासून बनविलेल्या दीड फूट लांब आणि तीन-चार इंच रुंद तसेच वरुण खाली उताराच्या स्वरुपाचे पिटणे चोपण्या च्या साहाय्याने ओला चिंब झालेल्या मुरुमावर जोराने चोप देऊन मुरुम बसविला जातो. असे तिन चार वेळा झाल्यानंतर त्याच्या वरुन शेणाचे सारवण दिले जाते. पुन्हा एकदा दोन चार वेळा चोप देऊन घराचे अंगण किंवा घर मुरुमाने चकचकीत चोपडे बनवले जाते.