अयनुद्दीन सोलंकी
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी, 03 नोव्हेंबर :- घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा चौफुली येथील राज्य महामार्गावरील आजुबाजुचे अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ काढण्याची मागणी, चिखलवर्धा येथील सामाजिक कार्यकर्ते सैय्यद नजीब सैय्यद नबी यांनी शासनाकडे केली आहे. विशेष म्हणजे चिखलवर्धा रस्त्यालगत सदरचे अतिक्रमण असुन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लेखी तक्रारीच्या प्रती जिल्हाधिकारी यवतमाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यवतमाळ, घाटंजी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता व तहसीलदार घाटंजी यांचे कडे सादर करण्यात आले आहे. दरम्यान, घाटंजीचे तहसीलदार विजय साळवे यांनी संबंधित चौकशी अर्ज पुढील कारवाईसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता पी. एच. धांडे यांचे कडे पाठविण्याचे निर्देश दिले आहे. घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा येथे चौरस्ता असुन या रस्त्यावरुन नांदेड, किनवट, माहुर, यवतमाळ, रामटेक, आर्णी, पांढरकवडा, घाटंजी येथुन अनेक एस. टी. बसेस ये – जा करत असतात. तसेच या रस्त्याने जड वाहनांची सुद्धा दिवस – रात्र ये जा सुरु असते. या पुर्वी चिखलवर्धा येथील चौफुली वर ट्रक खाली येऊन एक मुलगा चिरडला होता, हे येथे उल्लेखनीय. विशेष म्हणजे चिखलवर्धा येथील चौरस्त्यावरील आजुबाजुचे तसेच सावळी (सदोबा), सायफळ, कुर्ली मार्गावरील व ग्रामपंचायत कार्यालय लगत शाॅपींग सेंटर समोर अतिक्रमण करुन त्यानंतर पक्के शेड बनवुन दुकान थाटुन बसण्याच्या प्रयत काही अतिक्रमण धारक करित आहे. चिखलवर्धा चौफुली वरील अतिक्रमण तात्काळ काढून टाकण्यात यावे, या साठी या पुर्वीच सार्वजनिक बांधकाम मंत्री, राज्यमंत्री या सह संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी तक्रारी केल्या होत्या. मात्र, राजकीय दबावाखाली कोणतीही चौकशी करण्यात आली नाही. चिखलवर्धा चौफुली वरील सभोवतालचे अतिक्रमण पंधरा दिवसांत काढण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सैय्यद नजीब सैय्यद नबी यांनी शासनाकडे केली आहे. अन्यथा संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा सैय्यद नजीब यांनी शासनाला दिला आहे.


