संजय भोसले
तालुका प्रतिनिधी,कणकवली.
कोकण मराठी साहित्य परिषद मालवण शाखेतील २५ कवींचा कवितासंग्रह कवी कुलगुरू केशवसुत यांच्या पुण्यतिथी दिवशी म्हणजे ७ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रकाशित होत आहे. सदर प्रकाशन सोहळा बॅरिस्टर नाथ पै सेवांगन मालवण येथे दुपारी ठीक ०३ वाजून 30 मिनिटांनी सुरू होईल. या कवितासंग्रहातील कविता कोकण मराठी साहित्य परिषद मालवणच्या २२ उदयन्मुख कवींनी लिहिल्या असून त्यामध्ये रूजारिओ पिंटो, सुनंदा कांबळे, एकनाथ गायकवाड या तिघा प्रतिभावंत कवींच्या कवितांचा समावेश आहे. प्रत्येक कवीच्या प्रत्येक सहा कविता या कवितासंग्रहात असून एकूण १५० कवितांचा हा संग्रह सत्वश्री प्रकाशन रत्नागिरी यांनी प्रकाशित केला असून त्या कवितासंग्रहाचे संपादन सुरेश शामराव ठाकूर (अध्यक्ष कोकण मराठी साहित्य परिषद मालवण) यांनी केली आहे .श्री माधवराव गावकर यांची या कवितासंग्रहाला प्रस्तावना लाभली आहे . कोमसाप मालवणने यापूर्वी सिंधू साहित्य सरिता ,”बीज अंकुरे अंकुरे”. ही अनुक्रमे चरित्रात्मक आणि ललित साहित्याची पुस्तके प्रकाशित केली आहेत .त्यांना मराठी वाचक वर्गाचा बऱ्यापैकी प्रतिसाद ही लाभला आहे. सदर पुस्तक कोकण मराठी साहित्य परिषदेचे तीर्थक्षेत्र आणि कवी केशवसुतांचे जन्मगाव’ मालगुंड’ या गावाला आणि येथील केशवसुतांच्या स्मारकाला अर्पण करण्यात आले आहे. केशवसुतांच्या स्मारकाला कवितेच्या राजधानीला अर्पण होणारा हा मराठीतील पहिलाच काव्यसंग्रह आहे .कवितांचा शुभारंभ डॉक्टर विद्याधर करंदीकर यांच्या” अक्षरांची आरती”ने झालेला आहे . प्रकाशन सोहळा मंगेश मस्के अध्यक्ष कोमसाप सिंधुदुर्ग यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होत असून प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती नमिता कीर ,(केंद्रीय अध्यक्ष कोमसाप )अनिकेत कोनकर, (प्रकाशक सत्वश्री प्रकाशन), माधवराव गावकर ,सुरेश ठाकूर (संपादक) .आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी “सर आली धावून” हा काव्यवाचन कार्यक्रमही होणार आहे. सदर सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहण्याचे निमंत्रण कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण यांचे वतीने देण्यात आले आहे. सदर अक्षर सोहळ्याला सर्व काव्य रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर (निमंत्रक प्रकाशन सोहळा तथा उपाध्यक्ष कोमसाप मालवण) यांनी केले आहे.