दिपक गोसावी
तालुका प्रतिनिधी तळोदा
मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना शिक्षणदूत म्हणून काम करावे लागणार आहे. त्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणाबरोबरच परिणामकारक शिक्षण दिले पाहिजे असे प्रतिपादन तळवे केंद्राचे केंद्रप्रमुख अशोक बच्छाव यांनी तळोदा तालुक्यातील धानोरा येथे शुक्रवारी पार पडलेल्या शिक्षण परिषद मध्ये शिक्षकांना मार्गदर्शन करतांना केले. तळोदा तालुक्यातील तळवे जिल्हा परिषद केंद्र शाळेची ऑक्टोंबर महिन्याची शिक्षण परिषद धानोरा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये उत्साहात पार पडली. या शिक्षण परिषदेची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या शिक्षण परिषदेला प्रमुख अतिथी म्हणून धानोरा जिल्हा परिषद शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुळशीराम ठाकरे, उपाध्यक्ष रामसिंग ठाकरे, माजी पंचायत समिती सभापती मोहन ठाकरे,धानोरा येथील सरपंच सुनिता ठाकरे हे प्रामुख्याने उपस्थित होते. तर मार्गदर्शक म्हणून केंद्रप्रमुख अशोक बच्छाव हे होते. तसेच मुख्याध्यापक कैलास सोनवणे, ग्यान फाऊंडेशन चे क्रांती सोनवणे,पदोन्नती मुख्याध्यापक अमरचंद नागमल, धानोरा शाळेचे मुख्याध्यापक अमोल सुर्यवंशी उपस्थित होते. केंद्रप्रमुख अशोक बच्छाव यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करतांना पुढे म्हंटले की,व्यक्तींचा विकास हा परिणामकारक शिक्षणावर अवलंबून आहे. आणि म्हणून हा विकास होण्यासाठी प्रत्येक मुलांच्या अध्ययन निष्पत्ती विकसित व्हाव्यात. यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. दरवर्षी शिक्षण विभागातून एन.ए.एस, एस.इ.ए.एस. शिष्यवृत्ती यासारख्या परीक्षा होतात. त्यामध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता किती परिणामकारक आहे हे समजते. म्हणून सर्व वर्गशिक्षकानी परिणामकारक शिक्षण देणे आजची गरज आहे. तरच फलनिष्पत्ती होईल. असे ते म्हणाले. धानोरा शाळेचे शिक्षक सुरुपसिंग पाडवी यांनी इंग्रजी विषयाचा शैक्षणिक साहित्य वापरून आदर्श पाठ त्यांनी घेतला. यांसह शिक्षण परिषदेमध्ये विविध विषय घेण्यात आले होते यात पी पी टी द्वारे मागोवा घेणे, इंग्रजी पेटी साहित्य वापरून आदर्श पाठ, राज्यस्तरावरील उपक्रम आढावा, प्रशस्त ॲप वापर माहिती, पुस्तक परिचय वाचन प्रेरणा दिन, निपुण भारत मिशन उद्दिष्टे अंतर्गत क्षमता आधारित वर्गप्रक्रिया, व प्रशासकीय सूचना आदी विषयांची सविस्तर माहिती शिक्षकांनी देण्यात आली. यांसह शिक्षण परिषदेमध्ये सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली. व पी ए टी संकलित चाचणी १ यावर चर्चा घडवून आणली. व शिक्षकांनी यामध्ये सहभाग नोंदविला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दसवड शाळेचे मुख्याध्यापक उमेशकुमार पाडवी यांनी केले तर आभार तळवे शाळेचे शिक्षक गोकुळ बांगर यांनी मानले. या शिक्षण परिषदेला केंद्रातील सर्व मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.