मनोज गवई
तालुका प्रतिनिधी चांदुर रेल्वे
चांदुर रेल्वे:अवादा कंपनीने राजना व तुळजापूर शिवारातील सरकारी शिव पांदण रस्त्यावर केलेल्या अतिक्रमणाची मोका पाहणी केल्यानंतर कार्यालयाच्यावतीने ते तत्काळ मोकळे करू, असे लेखी आश्वासन चांदूररेल्वे तहसीलदाराने दिले. त्यानंतर स्थानिक तहसील कार्यालयसमोर माजी सरपंच इंद्रपाल बनसोड यांचे मागील तीन दिवसांपासूनसुरूअसलेले बेमुदत उपोषण शुक्रवारी सायंकाळी सुटले. यावेळी चांदूररेल्वे उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी,तहसिलदार पुजा माटोडे यांच्यासोबत उपोषणकर्ता बनसोड यांची चर्चा झाली. त्यामध्ये भूमि अभिलेख चांदूररेल्वे, सौर ऊर्जा प्रकल्प प्रतिनिधी व मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यासमक्ष मोका स्थळ पाहणी करून सौरऊर्जा प्रकल्प यांनी सरकारी शिव/पांदण रस्त्यांवरील अतिक्रमण तत्काळ मोकळे करण्याबाबत या कार्यालयाकडून कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी आश्वासन तहसीलदारांनी दिले. त्यानंतर माजी आ. प्रा. वीरेंद्र जगताप यांच्याहस्ते लिंबू शरबत प्राशन करून माजी सरपंच इंद्रपाल बनसोड यांनी आपले बेमुदत उपोषण सोडले. यावेळी चांदूररेल्वेचे उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी, तहसीलदार पूजा माटोडे, चांदूररेल्वे जर कृउबासचे सभापती जगदीश आरेकर, माजी नगराध्यक्ष प्रा. प्रभाकर वाघ,मांडवा ग्रा.पं.चे उपसरपंच सुरेश खडसे, ग्रा. पं. सदस्य प्रांजली फरकाडे, कृउबासचे माजी उपसभापती अशोक चौधरी, शिट्टू सूर्यवंशी,माजी सरपंच सुनिल गावंडे (राजना) यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.


