अयनुद्दीन सोलंकी
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी, 26 ऑक्टोंबर :- घाटंजी तालुक्यातील पंगडी येथील ग्रामपंचायत सचिव कोलते व उपसरपंच यांच्या मनमानी कारभारामुळे संतप्त झालेल्या पंगडी येथील आदिवासी महिला सरपंच यमुना हनुमान मेश्राम व गांवक-यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, घाटंजी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी महेश ढोले आदीं कडे लेखी तक्रार करुन ग्रामपंचायत सचिव कोलते यांची तत्काळ बदली करुन त्या ठिकाणी नविन ग्रामसेवक देण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा पंगडी येथील ग्रामपंचायत सरपंच यमुना मेश्राम व गांवक-यांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. ग्रामपंचायत पंगडी येथील ग्रामपंचायत कारभार पुर्वी पासुनच वादग्रस्त असुन नव्या तक्रारीने त्यात आणखीनच भर पडली आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायत सचिव कोलते हे सरपंच यांना विश्वासात न घेता उपसरपंचा सोबत हात मिळवणी करुन सरपंच यमुना मेश्राम हिला अपमानित करत असल्याचा आरोप लेखी तक्रारीतुन करण्यात आला आहे. तसेच सचिव हे सरपंच यांना मागितलेली कोणतीही माहिती देत नसुन तुमची मला काहीही आवश्यकता नाही, असे उद्धट उत्तर देत असल्याचा आरोप सरपंच यमुना हनुमान मेश्राम हिने केला आहे. पंगडी ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत सचिव कोलते यांनी जलजिवन मिशनची कामें पंगडी येथील उपसरपंच कदम यांना दिले असुन अनेक कामें अर्धवट व अपुर्ण आहे. तसेच पंगडी ग्रामपंचायतच्या ग्रामसभेची परवानगी न घेता 15 व्या वित्त आयोगाचा निधी वापरला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सचिव व उपसरपंच हे मनमानी कारभार करत असल्याचा आरोप गजानन चिंचोळकर व मदन मुनेश्वर आदींनी केला आहे. पंगडी येथील जल जिवन मिशनची पाईप लाईन फोडून कनेक्शन जोडण्यात आले असून गरज नसतांना 15 व्या वित्त आयोगाचा निधी वापरण्यात आल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. सरपंच यमुना मेश्राम हिला विश्वासात न घेता सचिव यांनी ग्रामपंचायतचे नोटीस बुक परस्पर शिपायाकडुन आपल्या ताब्यात घेतले आहे. वास्तविक पाहता, ग्रामपंचायतचे सर्व दफ्तर हे नियमानुसार ग्रामपंचायत कार्यालयात ठेवणे आवश्यक असतांना घाटंजीचे गट विकास अधिकारी महेश ढोले यांनी सदर नोटीस बुक मागितले असल्याचे सचिव कोलते यांनी सरपंच यांना सांगितले आहे. दरम्यान, नियमानुसार गट विकास अधिकारी यांना ग्रामपंचायत नोटीस बुकचे अजिबात कोणतेही काम नाही, असे दिसते. एकंदरीत पंगडी येथील ग्रामपंचायत सचिव कोलते यांची तत्काळ बदली करुन त्या ठिकाणी नविन ग्रामसेवक देण्याची मागणी करण्यात आली असून संबंधित निवेदनावर पंगडी ग्रामपंचायत सरपंच यमुना हनुमान मेश्राम, निळकंठ भोयर, मदन मुनेश्वर, गजानन चिंचोळकर, संजय माळोदे, गोविंदराव भोयर, अतुल भोयर व इतर गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहे. घाटंजी पंचायत समितीचे पंचायत विस्तार अधिकारी सखाराम ईसाळकर यांची प्रतिक्रिया घेतली असता, पंगडी गावकऱ्यांच्या लेखी तक्रारी वरुन पंगडी ग्रामपंचायतची चौकशी गट विकास अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सुरू आहे. सरपंच यमुना मेश्राम व इतर ग्रामपंचायत सदस्यांचे बयाण नोंदविणे बाकी आहे. तसेच संपूर्ण चौकशी झाल्यानंतरच घाटंजी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी महेश ढोले यांचे कडे चौकशी अहवाल सादर करणार असल्याचे ईसाळकर यांनी सांगितले. पंगडी येथील ग्रामपंचायत सचिव वर्षाराणी कोलते यांचेशी संपर्क केला असता, पंगडी ग्रामपंचायत अंतर्गत सर्व कामें मासीक सभेत ठराव मंजूर करुनच नियमानुसार करण्यात आले आहे. सदरची कामें नियमानुसार सुरू असु सरपंच व उपसरपंच यांना कामांवर लक्ष देण्याबाबत सुचना देण्यात आले होते. सरपंच व इतर गावकऱ्यांनी केलेली माझ्या विरोधातली तक्रार खोटी असुन बिनबुडाची आहे, असे सचिव कोलते यांनी स्पष्ट केले. पंगडी ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रमोद कदम यांचेशी संपर्क केला असता, पंगडी येथील गावकऱ्यांनी माझ्या विरोधात केलेली तक्रार पुर्णतः खोटी व बनावट आहे. विशेष करून मी पंगडी ग्रामपंचायतचे कोणतेही कामें केलेले नाही. मात्र, पंगडी ग्रामपंचायतचा विकास व्हावा या हेतूने अनेक शासकीय योजना शासनाकडुन मंजुर करुण आणल्या आहे. पंगडी येथील गावकऱ्यांच्या लेखी तक्रारी वरुन, घाटंजी पंचायत समितीचे पंचायत विस्तार अधिकारी सखाराम ईसाळकर यांनी पंगडी ग्रामपंचायतची चौकशी केली असुन लवकरच सदर अहवाल घाटंजी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी महेश ढोले यांचे कडे सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


