दिपक गोसावी
तालुका प्रतिनिधी तळोदा
तळोदा : सलसाडी या ठिकाणी प्रवेशित असलेले जेईई चे विद्यार्थी यांनी आपल्या समस्यांचा पाढा सोडविण्यासाठी दिनांक २५ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी सलसाडी येथून ठीक ००.०९ वाजेला प्रकल्प कार्यालयाच्या दिशेने तळोदा येथे पायीच आगेकूच केली असताना तळोदा प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी मंदार पत्की यांनी आमलाड ते तळोदानजीक त्यांचा मोर्चा रस्त्यातच अडविला आणि त्या मोरच्यात सहभागी विद्यार्थ्यांसोबत सकारात्मक चर्चा केली.या मोर्चामध्ये १०० ते १०५ विद्यार्थी तसेच विद्यार्थिनी सहभागी झाले होते. हे विद्यार्थी सकाळी ००.०९ वाजता सलसाडी येथून पायीच निघाले. मुख्याध्यापक तसेच अधीक्षक व शिक्षक यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला परंतू ह्या विद्यार्थ्यांनी कुणाचेही ऐकून न घेता सरळ प्रकल्प दिशेच्या मार्गाने आगेकुच केली. आणि आमलाड पासून काही अंतर पुढे गेल्यानंतर या संदर्भात प्रकल्प अधिकारी मंदार पत्की यांना माहिती मिळतात त्यांनी लागलीच या मोर्चाला भेट दिली. हे विद्यार्थी आमलाड ते कनकेश्वर मंदिराच्या मध्यभागी आल्यानंतर मंदार पत्की यांनी त्यांना रोखले व त्यांच्याशी आपुलकीने चर्चा केली व त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील समस्यांचा संपूर्ण पाढाच त्यांच्यासमोर वाचून दाखविला. यामध्ये जेईई साठी प्रशिक्षण देणारे प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे आम्हाला योग्य पद्धतीने प्रशिक्षण या ठिकाणी मिळत नसल्याची खंत त्यांनी त्यांच्यासमोर व्यक्त केली. त्यानंतर प्रोजेक्टर नसल्यामुळे आम्हाला इतर प्रॅक्टिकल ज्ञान मिळत नसल्याची ही बाब त्यांनी त्यांच्यासमोर बोलून दाखवली. त्याचबरोबर प्रॅक्टिकल साठी स्वतंत्र शिक्षक नेमावा असी मागणीही त्यांनी यावेळी त्यांच्यासमोर केली.सर्व समस्या ऐकून घेतल्यानंतर मंदार पत्की यांनी त्यांची समजूत घालताना योग्य शिक्षक तुम्हाला त्या ठिकाणी नियुक्त केले जातील असे आवर्जून आणि समजावून सांगितले. त्यानंतर प्रोजेक्टरची ही व्यवस्था करून देण्यात येईल. प्रॅक्टिकल साठी स्वतंत्र शिक्षकाची नेमणूक करून देण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. विद्यार्थ्यांचे मंदार पत्की यांनी केलेल्या चर्चेद्वारे समाधान झाल्यामुळे हा मोर्चा त्या ठिकाणाहून माघारी फिरला. या विद्यार्थ्यांना आमलाड येथील होस्टेलला काही वेळ थांबवण्यात आले. आणि त्यानंतर त्या ठिकाणाहून स्वतंत्र वाहनांच्या माध्यमाने सलसाडी पर्यंत पोहोचवण्यात आले.
“सदर विद्यार्थी हे सलसाडी येथून प्रकल्प कार्यालयाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे समजताच मी, लागलीच त्या ठिकाणाहून निघून रस्त्यातच त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या सर्व समस्या जाणून घेतल्या त्यात प्रामुख्याने समस्या होती ती, प्रशिक्षित शिक्षकांची त्यानंतर प्रात्यक्षिक दाखविणारे शिक्षकांची ही समस्या सोडवण्याबाबत मी त्यांना आश्वासित केले आणि विद्यार्थ्यांची समजूत घातली.त्यानंतर विद्यार्थ्यांचे समाधान झाल्याने आपला मोर्चा मागे वळवली.”
- मंदार पत्की
प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय तळोदा
“गेल्या दोन वर्षापासून आम्ही या ठिकाणी जेईई चे प्रशिक्षण घेत असून या ठिकाणी तज्ञ शिक्षकाची नेमणूक नाही त्यामुळे अभ्यासक्रम आमच्या लक्षात येत नाही. ही बाब आम्ही बऱ्याच वेळा आमच्या मुख्याध्यापकाकडे बोलून दाखवली असता त्यांनीही समस्या सोडवण्यासंदर्भात सांगितले.परंतु समस्या सुटली नाही त्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला या ठिकाणाहून प्रकल्प कार्यालय गाठण्यासाठी पायी स्वरूपात निघावे लागले. परंतू रस्त्यात प्रकल्प अधिकाऱ्यांनी भेट दिल्यामुळे आणि त्यांनी आश्वासित केल्यामुळे आमचे समाधान झाले असून आम्ही माघारी फिरलो.”
- प्रदीप वसावे
विद्यार्थी जेईई धडगाव(सलसाडी) तालुका तळोदा












