अयनुद्दीन सोलंकी
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी : घाटंजी ते यवतमाळ मार्गावरील वडगांव जंगल पोलीस स्टेशनच्या हद्दीत कारेगांव शेतशिवारात यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून बावन पत्ते जुगार खेळतांना 16 जणांविरुद्ध जुगार कायद्याखाली गुन्हे नोंदवुन त्यांच्या जवळुन 5 लाख 2 हजार 180 रुपये रोख, तसेच गुन्ह्यात मोबाईल, वाहने इत्यादी 24 लाख 44 हजार रुपये असा एकूण 29 लाख 46 हजार180 रुपयाचा मुद्देमाल यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मनवर, पोलीस उप निरीक्षक धनराज हाके, पोलीस हवालदार विनोद राठोड, प्रशांत हेडाउ, सुभाष किनाके, पोलीस शिपाई आकाश सहारे आदींनी जप्त केला आहे. सदरचा छापा यवतमाळचे पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला. दिनांक 22 ऑक्टोबर रोजी वडगांव जंगल पोलीस स्टेशनच्या हद्दीत कारेगांव शेतशिवारात सार्वजनिक ठिकाणी जुगार सुरु असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली. त्यानुसार कारेगांव शेतशिवारात राजु दत्तुजी गिरी (वय 49, रा. दांडेकर ले आऊट यवतमाळ) हा जुगार अड्डा चालवित होता, अशी माहिती पोलिसांना प्राप्त झाली. त्यामुळे कारेगांव शेतशिवारात स्थानिक गुन्हे शाखेने जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्यात राजु गिरी (वय 49 यवतमाळ), अजय देशमुख (वय 49 यवतमाळ), विलास भगत (वय 40, घाटंजी), मेघराज घागी (वय 26 रा. वरुड), प्रतिक गंधारे (वय 25, घाटंजी), रवि बिसमोरे (वय 42, घाटंजी), अतुल चव्हाण (वय 24, रा. घोटी), चंदन पवार (वय 32, रा. पारवा), शकील शेख चांद (वय 30, रा. पारवा), सागर खाडे (वय 30, रा. वरुड), संतोष मेश्राम (वय 36, रा. सुकळी), सिद्धार्थ रामटेके (वय 35, रा. घाटंजी), तैय्यब शहा उस्मान शहा (वय 49, यवतमाळ), दिपक जैस्वाल (वय 38, रा. वडगांव), प्रमोद छाजेड (वय 50, यवतमाळ), मुस्सवीरखाॅ मनवरखाॅ (वय 28, रा. बाभुळगांव) आदीं 16 इसम हार जितचा जुगार खेळतांना मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यातून 52 गंजीपा पत्ते जुगाराच्या डावातील रोख रक्कम 2 लाख 360 रुपये, अंग झडतीत 3 लाख 1 हजार 820 रुपये असे एकूण 5 लाख 2 हजार 180 रुपये तसेच गुन्ह्यात जप्त मोबाईल व वाहने अंदाजे किंमत 22 लाख 44 हजार रुपये असा एकूण 29 लाख 46 हजार 180 रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला. या बाबत 16 इसमांविरुद्ध वडगांव जंगल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर जुगार अड्यावर छापा पडल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात खळबळ माजली आहे.