अयनुद्दीन सोलंकी
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी – घाटंजी येथे तीरळे कुणबी समाज बांधवांची सहविचार सभा घाटंजी येथे आयोजित करण्यात आली होती. आधुनिक काळात लग्न जुळविण्यासाठी परिचय मेळावा घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे. यासाठी सहविचार सभा रामचंद्र इंगोले, साईधाम येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी समाजाच्या वतीने परिचय मेळावा घेण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. या सभेला घाटंजी तालुक्यातील व लगतच्या यवतमाळ, पांढरकवडा व आर्णी तालुक्यातील तिरळे कुणबी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. रविवारी झालेल्या सभेत परिचय मेळावा घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यामध्ये सर्वानुमते वधू – वर परिचय मेळावा 21 जानेवारी 2024 रोजी सुपुनाथ मंगल कार्यालय, मुर्ली ता. घाटंजी येथे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील वर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा डिजिटल परिचय मेळावा होणार असून यावेळी परिचय पुस्तिका सुद्धा प्रकाशित होणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने युवक, युवती सह तिरळे कुणबी समाजातील गणमान्य नागरिक उपस्थित होते. मागील वर्षी विदर्भ स्तरीय वधु वर परिचय मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता. यावेळी सुद्धा मागील वर्षा पेक्षा चांगले नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती दैनिक देशोन्नतीचे घाटंजी वार्ताहर / शहर प्रतिनिधी प्रशांत उगले यांनी दिली.