अयनुद्दीन सोलंकी
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी : घाटंजी तालुक्यातील घाटंजी येथील आरोपी बार मालक विक्रम घनश्याम जैस्वाल (वय 46, रा. जलाराम मंदीर वार्ड घाटंजी) याची विनयभंग प्रकरणातून घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधिश, प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी तथा पिठासिन अधिकारी ए. ए. उत्पात यांच्या न्यायालयाने भादंवि 354, 323 प्रकरणात निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपीतर्फे ज्येष्ठ वकील ॲड. अनंतकुमार पांडे यांनी काम पाहिले. तर शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. एन. आर. गायकवाड यांनी शासनाची बाजु मांडली. दिनांक 16 डिसेंबर 2016 रोजी दुपारी 3.15 वाजणेचे सुमारास फिर्यादी मुलगी ही डॉ. बोंडे यांच्या खाजगी ईस्पितळाजवळ राहुल जिवणे यांच्या सेतु केंद्रात परिक्षा फाॅर्म भरण्यासाठी गेली होती. आरोपी विक्रम घनश्याम जैस्वाल याने तेथे जाऊन ‘मला तुझ्या सोबत बोलायचे’ आहे, असे म्हटले. परंतु फिर्यादी मुलगी हिने आरोपी सोबत बोलण्यास नकार दिला. आरोपीने चिडुन जाउन फिर्यादी मुलीला चापट, बुक्याने मारले तसेच तिचे केस धरुन सेतुतील बेंच वर पाडले. त्यामुळे फिर्यादीचे दात पडले. नंतर आरोपी विक्रम जैस्वाल याने फिर्यादी मुलीचे तोंड दाबून वाईट उद्देशाने तिची छाती दाबुन तिचा विनयभंग केला. या वेळी तिची मैत्रीण मोहीनी परचाके ही सोडवण्यासाठी आली असता आरोपीने तिचा देखील हात धरून पीरगाळला. घटनास्थळी नागरिकांची गर्दी होताच आरोपी विक्रम घनश्याम जैस्वाल हा तेथुन निघुन गेला. फिर्यादी मुलगी बदनामीच्या भितीने घाटंजी पोलीस ठाण्यात उशीरा रिपोर्ट दाखल केला. त्यानुसार, आरोपी विक्रम घनश्याम जैस्वाल (वय 46, रा. बार मालक जलाराम मंदीर वार्ड घाटंजी) याचे विरुद्ध घाटंजी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 354, 323 अंतर्गत गुन्हा नोंद करुन तपासात घेतला. सदर प्रकरणाचा तपास जमादार सुनिल दुबे यांनी केला. तपासा दरम्यान फिर्यादी मुलगी, साक्षीदारांचे बयाण, घटनास्थळ पंचनामा, फिर्यादीचे वैद्यकीय प्रमाणपत्र प्राप्त करुन आरोपी विक्रम जैस्वाल यांस घाटंजी पोलीसांनी अटक केली. तसेच आरोपी विरुद्ध सबळ पुरावा मिळाल्याने घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सदर प्रकरणात सरकारी पक्षाने सहा साक्षीदार तपासले. मात्र, सरकारी पक्ष गुन्हा सिद्ध करण्यास अपयशी ठरल्याने घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधिश, प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी तथा पिठासिन अधिकारी ए. ए. उत्पात यांनी आरोपी विक्रम घनश्याम जैस्वाल, रा. घाटंजी याची निर्दोष मुक्तता केली. आरोपी तर्फे ज्येष्ठ वकील ॲड. अनंतकुमार पांडे यांनी काम पाहिले. तर शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. एन. आर. गायकवाड यांनी शासनाची बाजु मांडली. आरोपी विक्रम जैस्वाल याची भादंवि कलम 354, 323 प्रकरणातुन निर्दोष मुक्तता झाल्याने आरोपीने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 437 – ए मध्ये नमुद प्रमाणे सहा महिन्यांच्या कालावधीत करिता रुपये 15,000 चे वैयक्तिक बंधपत्र व तितक्याच रकमेचे जामीन पत्रे द्यावे, असा आदेश प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अतुल उत्पात यांनी दिला आहे.