दिपक गोसावी
तालुका प्रतिनिधी तळोदा.
तळोदा : परिसरात दिवसपर दिवस कापूस विक्रीत वाढ होत असून अनेक व्यापाऱ्यांनी बोरद येथे कापूस खरेदीची दुकाने थाटण्यास सुरुवात केली आहे. मध्यप्रदेश तसेच शेजारील गावातील व्यापारी या ठिकाणी येऊन स्थानिक एजंटा करवी कापसाची खरेदी करीत असतात. कापूस दिवसागणिक शेतकऱ्यांच्या घरी येऊ लागल्याने मजुरीसाठी शेतकऱ्यांना काही प्रमाणात कापसाची विक्री करावी लागत आहे. हीच बाब हेरून अनेक व्यापारी हे खेडा पद्धतीने कापसाची खरेदी करण्यासाठी खेड्यातही फिरू लागले आहेत. अशा वेळेस कापूस खरेदी करताना त्यांच्याकडे असलेल्या वजनकाट्याच्या साहाय्यानेच ते कापसाचे वजन करून खरेदी करीत आहेत. अशा परिस्थितीत बऱ्याच ठिकाणी वजन काट्या मध्ये तफावत असण्याची दाट शक्यता आहे.गेल्या अनेक वर्षांचा अनुभव पाहता खेड्यांमध्ये अनेक घटना अशा घडल्या आहेत की,वजनात पाप केल्यामुळे व्यापाऱ्याला बेदम मारहाण झालेली आहे.बऱ्याच गावात यापूर्वी व्यापारी कापसाचे वजन करताना गडबड घोटाळा करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. असे असले तरीही व्यापाऱ्यांची खेड्यात येण्याची कमी नाही. आणि त्यांना कापसाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची ही कमी नाही. वारंवार आपण नाडले जातो हे लक्षात आल्यावर सुद्धा शेतकरी अशाच व्यापाऱ्यांना कापूस देणे पसंत करतात. कारण कापूस बाहेर विक्रीसाठी भरून घेऊन जाणे ही शेतकऱ्याला परवडत नाही.आजकाल मजुरी भरमसाठ वाढली आहे किंबहुना उधडा
पद्धतीनेच काम करण्यात येते. त्यामुळे कापसाची काढणी करताना किलोमागे पाच रुपये ते आठ रुपये याप्रमाणे दर मजुरांना द्यावा लागत आहे त्यानंतर घरामध्ये त्याला व्यवस्थित रचणी करण्यासाठी ही मजुरी लागत आहे. अशा परिस्थितीत जर बाहेरगावी विक्री करायचं ठरवलं तर पुन्हा त्या कापसाला एखाद्या वाहनांमध्ये भरून त्या ठिकाणी भरून घेऊन जावं लागतं त्यामुळे घरातून कापूस वाहनांमध्ये भरतानाही मजुरी लागते आणि त्यानंतर वाहन विक्रीच्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी ही वाहनाला भाडे लागते. अशा वेळस कापूस विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांना तो भाव मिळतो तो परवडेनासा होतो. त्यामुळे गावात आलेल्या व्यापाऱ्यांना कापूस देणे शेतकरी पसंत करतो. हे शेतकऱ्याचे वैयक्तिक मत आहे पण शेतकरी राजा हा कुठल्याच प्रमाणात वजन काट्याची पडताळणी करत नाही. आणि पडताळणी जरी केली तरी व्यापाऱ्यांचे दलाल, तसेच मापाडी एवढे हुशार असतात की, ते कुठल्यातरी मार्गाने त्या ठिकाणी वजनात पाप केल्याशिवाय राहत नाही. ही बाब हेरून प्रशासनाने ही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जिल्हा वजनमाप विभागामार्फत या ठिकाणी वजन काटांची वेळोवेळी तपासणी होणे गरजेचे आहे. त्यानंतर परिसरात एखादे कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी स्थापित करणे गरजेचे आहे. जेणेकरून खेड्यामध्ये जाण्याआधी व्यापारी आपल्या वजन काट्याची तपासणी त्या ठिकाणी करून घेतील आणि त्या पद्धतीने खेड्यात जाऊन कापसाची खरेदी करू शकतील. याच्यामुळे शेतकऱ्यांनाही फायदा होईल आणि व्यापाऱ्यांनाही आपले समाधान लाभेल की, आपण शेतकऱ्यांना लुटले नाही. आणि शेतकरी ही सांगू शकेल की आपण माल विकताना फसलो नाही. असेच जर व्यवस्थित व्यापारी शेतकऱ्यांमध्ये समतोल असेल तर भविष्यात शेतकरी कुठल्याही व्यापाऱ्याला आपला माल देताना धजावणार नाही. त्यामुळे शासनाने या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.


