संजय भोसले
तालुका प्रतिनिधी,कणकवली
मुंबई येथे सरकारी निम-सरकारी, शिक्षक-शिक्षकेतर व नगरपालिका- नगरपरिषद कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांची सभा बांधकाम भवन सी.एस.टी. मुंबई येथे संपन्न झाली. या सभेमध्ये जुनी पेन्शन योजना सर्वांना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावी या प्रमुख मागणीसह इतर अनेक मागण्यांसाठी आंदोलनाची भूमिका ठरविण्यात आली. यावेळी जुनी पेन्शन योजना सर्वांना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावी या प्रमुख मागणीसह सर्व संवर्गातील रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत, खाजगीकरण कंत्राटीकरण कायमस्वरूपी रद्द करावे, शिक्षणाचे खाजगीकरण थांबवावे, रिक्त शिक्षक- शिक्षकेतर पदे तात्काळ भरण्यात यावीत, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना तात्काळ लागू करण्यात यावी, शाळांमधील शिपाई सेवकांची व्यपगत केलेली ५२ हजार पदे पुनर्जीवित करून तात्काळ पद भरती करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसह इतर सर्व संवर्गाच्या मागण्या घेऊन आंदोलनाची भूमिका ठरविण्यात आली. त्यानुसार दिनांक ०८ नोव्हेंबर २०२३ रोजी मी व माझे कुटुंबीय यांचा धडक मोर्चा तालुकास्तरावर तहसीलदार कार्यालयावर व जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येईल.यानंतर १४ डिसेंबर २०२३ पासून महाराष्ट्रात सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, नगरपालिका- नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने यापूर्वी संस्थगित केलेला बेमुदत संप सुरू करण्यात येईल.
याप्रसंगी मुंबई विभागाचे शिक्षक आमदार कपिल पाटील, भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस ए. श्रीकुमार, महाराष्ट्र राज्य समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर, राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अशोक दगडे, समन्वय समितीचे शिवाजी खांडेकर, बेस्ट कर्मचारी संघटनेचे शशांक राव, महानगरपालिका कर्मचारी संघटनेचे डॉ. डी. एल. कराड, शिक्षक संघटनेचे ज्ञानेश्वर कानडे, शिक्षक भारतीचे सुभाष मोरे, प्रकाश शेळके, शिक्षकेतर संघटनेचे विनोद गोरे, पोपट जमदाडे, जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे बलराज मगर, उमेशचंद्र चिलबुले, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे भाऊसाहेब पठाण, मध्यवर्ती संघटनेचे अविनाश दौंड, प्राथमिक शिक्षक समितीचे राजन कोरगावकर व सतीश इनामदार हे उपस्थित होते. या सभेस महाराष्ट्र राज्यातील शिक्षण व आरोग्य विभागासह सर्व विभागाच्या संघटनांचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती संस्थाचालक- मुख्याध्यापक शिक्षक-शिक्षकेतर समन्वय समितीचे समन्वयक शिवाजी खांडेकर यांनी कळविली.