अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
मालेगाव : विविध नैसर्गिक आपत्ती व सरकारने पाडलेले सोयाबीनचे भाव यामुळे जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून सोयाबीनची भाववाढ व पिकविम्यासाठी आज मालेगाव शहर बंदची हाक देण्यात आली होती. त्याला व्यापाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.राज्यातील सर्वाधिक सोयाबीन उत्पादन हे वाशिम जिल्ह्यात घेतले जाते. सोयाबीनवरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आणि पर्यायाने व्यापाऱ्यांचे अर्थकारण चालते मात्र मागील दोन वर्षापासून सोयाबीनच्या दरात मोठी घट झाली आहे. शिवाय उशिरा झालेल्या पेरण्या, अतिवृष्टी, ऐन दाणे भरण्याच्या अवस्थेत पडलेला पावसाचा खंड व यलो मोझ्याक सारख्या रोगाचा झालेला मोठा प्रादुर्भाव यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. यंदा मुरमाड जमिनीत एकरी केवळ दोन ते तीन क्विंटल तर भारी जमीनतीही चार ते पाच क्विंटलचा उतारा येत आहे. तर दुसरीकडे महागाई नियंत्रित करण्याच्या नावाखाली सोया तेलाच्या किमतीत वाढ होऊनये म्हणून सरकरकारने सोयाबीनचे दर पाडले आहेत. मुळात यंदा सरकारने सोयाबीनला ४६०० रुपयांचा हमीभाव जाहीर केलेला असतांना बाजारात या पेक्षाही कमी दर मिळत आहेत. त्यामुळे उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक होऊन सोयाबीनची शेती तोट्यात आली आहे. उत्पादन खर्च बघता सोयाबीनला किमान ८ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सोयाबीनला किमान ८ हजार रुपये भाव देण्यात यावा,
पिकविम्याची अग्रीम रक्कम देण्यात यावी, यलो मोझ्याकने बाधित शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा मंजूर करावा,खरीप 2023 मध्ये झालेल्या अतिवृष्टीची मदत देण्यात यावी व 2022 मध्ये झालेया अतिवृष्टी व गारपिरीची मदत राहिलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावी या मागण्यांसाठी युवक प्रदेशाध्यक्ष दामुअण्णा इंगोले यांच्या नेतृत्वात मालेगाव बंदची हाक दिली होती. व्यापाऱ्यांनी बंदला चांगला प्रतिसाद देऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला यावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर फिरून घोषणाबाजी केली.