अयनुद्दीन सोलंकी
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी – घाटंजी तालुक्यातील पारवा परिसरातील अनेक गावात 33 के. व्ही. उपकेंद्रा अंतर्गत विज पुरवठा होतो. त्यामुळे जांब फिडर मधील शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा 8 तास विज पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी रामनगर व परिसरातील नागरिकांनी केली आहे. विज वितरण कंपनीच्या भारनियमामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीला पारवा येथील 33 के. व्ही. उपकेंद्र जबाबदर राहतील, असे ही लेखी निवेदनात म्हटले आहे. आर्णी – केळापूर मतदार संघाचे माजी आमदार प्रा. राजु तोडसाम यांच्या उपस्थितीत पांढरकवडा येथील विज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले आहे.
विज वितरण कंपनीने दोन दिवसात शेतकऱ्यांची मागणी पूर्ण न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा घाटंजी तालुक्यातील रामनगर, वघारा (टाकळी), सावरगांव, सावंगी (संगम), धामणधरी, ठाणेगांव, भीमकुंड, सगदा, सावरगांव मंगी आदीं गावातील शेतकऱ्यांचे निवेदन विज वितरण कंपनीला दिले आहे.
पारवा परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना 8 तास वीज पुरवठा झालाच पाहिजे, असे नारे या वेळी देण्यात आले.
अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुध्दा देण्यात आला आहे. यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी कर्ज, उसनवार घेऊन भाजीपाला, मिरची, कापूस इत्यादीची लागवड केली आहे. बोअरवेल, विहीर, नदी व नाल्यावर कृषिपंप वीज जोडणी करून, कृषिपंपाच्या सहाय्याने रोपे लावून काम पूर्ण केले असता काही दिवसांतच शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता कृषिपंपासाठी रोज 24 तासांतून फक्त 3 तास वीज पुरवठा होत आहे. जवळपास दिवसभरात 15 ते 20 वेळा विज पुरवठा बंद – चालू होत असतो. कित्येक शेतकऱ्यांना पाण्याअभावी पिके करपल्याने नुकसान सोसावे लागत आहे. तसेच कमी दाबाचा विद्युत पुरवठा मिळाल्याने इलेक्ट्रिक मोटारी जळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतांना पुरेसा पाणी ओलीतासाठी मिळत नाही.











