संजय भोसले
तालुका प्रतिनिधी, कणकवली
आजकाल इंटरनेटच्या वापरातून तरुणांचा स्क्रीन टाईम वाढत असून सायबर गुन्ह्यांना त्याची साथ मिळत आहे असे प्रतिपादन एम. के. सी. एल. चे जिल्हा समन्वयक प्रणय तेली यांनी तळेरे येथे विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी कॉलेज येथे आयोजित करण्यात आलेल्या सायबर सुरक्षा या विषयावरील कार्यक्रमात केले. सदर कार्यक्रम वामनराव महाडिक विद्यालय आणि दळवी महाविद्यालय या विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ‘सायबर सिक्युरिटी’ या विषयावर एम.के.सी.एल.चे जिल्हा समन्वयक प्रणय तेली, श्रावणी कम्प्युटर्स तळेरे आणि जिल्हा पोलीस विभाग सायबर क्राईम डिपार्टमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती देवीचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. श्रावणी कॉम्प्युटर्सचे संचालक सतीश मदभावे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मोबाईल आणि इंटरनेट यांच्या माध्यमातून ज्ञात अज्ञात चुकीने सायबर गुन्हे घडत असल्याचे प्रतिपादन केले. यातून अनेकांना आर्थिक, मानसिक फटके बसल्याची उदाहरणे त्यांनी सांगितली.एम.के.सी.एल. चे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक प्रणय तेली यांनी इंटरनेटच्या माध्यमातून फसवे संदेश कसे पाठवले जातात आणि त्यांना मोबाईलधारक कसे सहज बळी पडतात याबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना दृकश्राव्य माध्यमाद्वारे माहिती देऊन जागृत केले. आपणांस आपला सायबर गुन्हेगारांपासून कसा बचाव करता येईल याबाबतचे अतिशय महत्त्वपूर्ण आणि उद्बोधक मार्गदर्शनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले. अमिषदायक संदेशांना बळी पडून अज्ञानाने वृद्ध वर्ग आणि इंटरनेटचे ज्ञान असणारा आजचा तरुण वर्गही सायबर गुन्हेगारांना पोषक ठरत चालले आहेत. यामध्ये तरुणांची संख्या अधिक असल्याची माहिती प्रणय तेली यांनी यावेळी दिली.कणकवलीचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून इंटरनेटचा वापर करीत असताना मोहक संदेशांना बळी पडून अनेकजण फसतात. काहींची रक्कम लुटली जाते. काही तरुणींना व महिलांना तसेच तरुणांनाही ब्लॅकमेल केले जाते. अमिष दाखवून खाजगी माहिती लाटून या माहितीचा वापर करून धमकावून ड्रग विक्रीसारखी हवी तशी गुन्हाप्रद कामे सायबर गुन्हेगार फसगत झालेल्यांकडून करून घेतात मात्र पोलीस यंत्रणा अशा गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यास अतिशय संवेदनशील आणि सक्षम असल्याचे प्रतिपादन यादव यांनी केले. इंटरनेटचा वापर करताना सर्वांनी दक्ष राहावे. आपल्याला कोणी फसवीत आहे किंवा अमिष दाखवीत आहे असे वाटल्यास पोलिसांशी त्वरित संपर्क करावा असे आवाहनही त्यांनी केले. *यावेळी सायबर क्राईम आपणाकडून होणार नाही याबाबत दखल घेण्याची तसेच सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कटिबद्ध राहण्याची शपथ सामाजिक कार्यकर्त्या श्रावणी मदभावे यांनी सर्व उपस्थितांकडून घेवविली. प्रज्ञा साळवी या विद्यार्थिनीने याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रकटन प्रणाली मांजरेकर यांनी केले.कार्यक्रमात लोकल क्राईम ब्रँचचे ए.पी.आय. महेंद्र घाग, ए,पी.आय. सायबर पोलीस विकास बडवे, रोटरी क्लबचे असिस्टंट गव्हर्नर राजन बोभाटे, सायबर पोलीस नाईक सागर भोसले, लोकल क्राईम ब्रँच पोलीस हवालदार किरण देसाई, पत्रकार उदय दुदवडकर, प्राध्यापक हेमंत महाडिक, ह्यूमन राईट संघटनेते कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, कासार्डे पोलीस चंद्रकांत झोरे आदी मान्यवर उपस्थित होते.