बाळू वाघ
शहर प्रतिनिधी, जामनेर
जामनेर : तालुक्यातील फत्तेपूर मादनी रस्त्यावर ईको कार आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे भाऊ ठार झाले असून कारचालक गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पहूर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, फत्तेपूरहून जळगाव येथे इको कार (एमएच १९ ईए २७७९) हि जळगावला वृद्ध रुग्णाला घेऊन निघाली होती. कारमध्ये वृद्ध महिला, पुरुष, त्यांचा नातू व सून असे होते. कार लोणी गावाजवळ आली असताना समोरासमोर दोघांची जबर धडक झाली, अपघात इतका भीषण होता की, दुचाकीवरील सौरव कैलास कोळी (वय २२, रा. कोदोली ) हा तरुण मयत झाला. तर दुचाकीवरील दुसरा शुभम दिनकर जाधव (वय २८, रा. शिगाईत ता. जामनेर ) हा गंभीर जखमी असून त्याला जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असता तेथे प्रथमोपचार झाल्यावर खाजगी रुग्णालयात नातेवाईकांनी नेत होते. तेथे त्याचा मृत्यू झाला आहे. तर इको कारवरील चालक मंगेश संतोष कोळी ( वय २०, रा. फत्तेपूर) हा देखील गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याच्या पायाला, कमरेला व डोक्याला गंभीर मार लागला आहे. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान पहूर पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली आहे.