मकरंद जाधव
तालुका प्रतिनिधी श्रीवर्धन
एका बाजूला विज्ञानाची प्रगती आणि दुसऱ्या बाजूला अनेक अंधश्रद्धांना कवटाळून जगणारा समाज हे दृष्य आज आपण सर्वत्र पाहतो.खऱ्या अर्थाने समाज विकसित होऊन अंधश्रद्धांपासून मुक्त असावा यासाठी या क्षेत्रात गेली तेहत्तीस वर्षे अखंडितपणे कार्यरत असलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांतर्गत जिल्ह्यात पुरोगामी निर्णय घेत समाजाला पुढे नेणाऱ्या व्यक्ती,संस्था,ग्रामपंचायती,समाज मंडळं यांच्याजवळ संवाद साधून त्यांच्या कृतीचं कौतुक करून त्यांना संघटनेची साथ द्यावी या हेतूने जिल्हास्तरीय अंधश्रध्दा निर्मूलन विचार संवाद अभियानातंर्गत दक्षिण रायगडमधील श्रीवर्धन,दिवेआगर, खुजारे गावांना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली.यात रायगडमध्ये विधवा प्रथा बंदीचा ठराव करणारी श्रीवर्धन तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत खुजारे येथे भेट देऊन या ठरावामागील पार्श्वभूमी व त्यांनंतर या धाडसी निर्णयाची अंमलबजावणी करताना आलेले अनुभव जाणून घेतले.त्यांच्या या निर्णयाच्या प्रेरणेने इतर ग्रामपंचायत व समाज मंडळांनी आपापल्या गावात केलेल्या अंमलबजावणीची माहिती घेतली.याच तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ दिवेआगर ग्रामपंचायतीने देखील विधवा प्रथा बंदीबरोबरच घेतलेल्या विविध समाजाभिमुख निर्णयाबरोबरच गावाच्या विकासासाठी असणारी कटिबध्दता त्यांच्या कार्यप्रणालीतून दिसून आली.श्रीवर्धन माळी समाजाच्या पुढाकाराने समाज बांधवांसाठी विधवा प्रथा बंदी बरोबरच परिवर्तनवादी घेण्यात आलेले निर्णय, महिलांसाठी आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमात विधवांनासुध्दा सन्मानपूर्वक सहभागी करुन घेणे, मृत्यूनंतरच्या कर्मकांडाना विधायक पर्याय देत रक्तदानासारखे उपक्रम समाजाच्या पुढाकाराने राबविणाऱ्या मंडळाने ‘अंनिस’ सोबत संपूर्ण सहकार्य करत समाजातील सर्व घटकांसाठी विशेषतः महिलांसाठी कार्यक्रम घेण्यास उत्सुकता दर्शवली. श्रीवर्धनमधील ज्युपिटर कॅलम्पस या कंपनीच्या व्यवस्थापनाने रबाळे युनिट मधील ज्योतिराम शिंदे यांच्या सहकार्याने तेथील सर्व कर्मचाऱ्यांसाठी ‘जागर स्त्री शक्तीचा’ ‘प्रवास मानसिकता बदलाचा’ या आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहून कंपनीचं कौतूक केलं.या संपुर्ण प्रवासात दिवेआगर सरपंच सिध्देश कोसबे,सदस्य श्रुती कोसबे,तृप्ती चोगले,राकेश केळस्कर,खुजारे सरपंच लिलावती खेडेकर,सदस्य महादेव खेडेकर,गाव अध्यक्ष शरद खेडेकर,अंगणवाडी सेविका समृद्धी घोले,श्रीवर्धन माळी समाज अध्यक्ष अनंत गुरव,उपाध्यक्ष प्रविता माने ज्युपिटर कॅलम्पस कंपनीचे शैलेश चोगले,महिला आणि ग्रामस्थ या सर्वांचं लाभलेलं सहकार्य आणि सकारात्मक प्रतिसादाबद्दल ‘अंनिस’च्या पदाधिकाऱ्यांनी आभार व्यक्त केले.खुजारे ग्रामपंचायत व ग्रामसेवक शंकर मयेकर यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयाची दखल घेत रायगड ‘अंनिस’च्या वतीने त्यांचा लवकरच सन्मान करण्याबरोबरच समाजातील पुरोगामी निर्णयात पुढाकार घेणाऱ्या व्यक्ती,समाज मंडळ यांच्याशी संपर्कात राहून ‘अंनिस’च्या माध्यमातून यापुढे विवेकी समाज निर्मितीसाठी सर्वतोपरी सहकार्य देण्याचं आश्वासन दिलं.या संवाद अभियानामध्ये महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह आरती नाईक,प्रियांका खेडेकर, जिल्हा प्रधान सचिव सिद्धेश गोसावी,जिल्हा कार्यवाह मनोहर तांडेल यांनी सहभाग घेतला.