माबुद खान
तालुका प्रतिनिधी जिंतूर
परभणी : बहूजन शासक बनो मिशन २०२४ महाराष्ट्र राज्य अधिवेशन तयारी अंतर्गत शनिवार, १४ ऑक्टोंबर रोजी दुपारी १२ वाजता परभणी येथील स्टेशन रस्त्यावरील जिल्हा परिषद कन्या प्रशालेमध्ये युवा राष्ट्रीय सचिव सौरभ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बहुजन मुक्ती पार्टीच्या जिल्हास्तरीय अधिवेशनाचे संपन्न झाले.
या अधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी) मोर्चाचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रा. आर.एस. यादव यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मौर्य क्रांती संघाचे टी.टी. सुभेदार, बहूजन मुुक्ती पार्टी युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष लखनदादा चव्हाण, राज्य सहसचिव प्रमोद लाटे, अंनिसचे राज्य कार्यकारी सदस्य डॉ. सुनिल जाधव, मुलनिवासी महिला संघाच्या छाया बलखंडे, लहुजी क्रांती मोर्चाचे नितीन कांबळे यांची उपस्थिती राहील. या वेळी जिल्ह्यातील अनेक मान्यवर मंडळी तसेच बहुजन मुक्ती पार्टीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. भारतात लोकशाही जिवंत ठेवायचे असेल तर देशातील निवडणूक मुक्त निपक्ष झाल्या पाहिजेत, शेती व शेतकरी विरोधी धोरणामुळे आज शेतकर्यांच्या हजारो समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे लाखो शेतकरी आत्महत्या करीत आहेत. आरक्षणाच्या मुद्यावरुन मराठा आणि ओबीसी यांच्यात अविश्वासाचे वातावरण निर्माण करुन दोन्ही समाजात जातीय तेढ निर्माण करुन भांडणे लावणे हा शासक जातीचा फोडा आणि राज्य करा या धोरणाचा परिणाम आहे. अशा अनेक ज्वलंत विषयांवर जनजागृती, राज्य अधिवेशनाचा आढावा व आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने जिल्हास्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. बहुजन समाजातील नागरिकांनी विचारवंतांनी या जिल्हास्तरीय अधिवेशनामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुभाष साळवे साडेगावकर तथा परभणी जिल्हा युनिटच्या वतीने करण्यात आले आहे.