दिपक गोसावी
तालुका प्रतिनिधी तळोदा.
तळोदा: केंद्र शासनाकडून यापूर्वीच धान्यविक्रीवर कपात(कट्टी) बंद केली असतांना सुद्धा काही व्यापाऱ्यांकडून ही कपात सुरू होती.कपात करतांना क्विंटल मागे एक किलो याप्रमाणे ही कपात केली जात होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत होते. सध्या आता शेतकऱ्यांचा कापूस हा विक्रीसाठी उपलब्ध झाल्यामुळे शेतकरी आपल्या गरजेनुसार कापूस विक्री केंद्रावर जाऊन त्या ठिकाणी आपला कापूस विक्री करत आहेत. अशा वेळेस कापूस विक्रीवरील कपात (कट्टी) बंद असून सुद्धा केदारेश्वर फायबर्स निंभोरा ता. कुकरमुंडा जि.तापी येथे विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांकडून एका क्विंटल मागे एक किलो याप्रमाणे कट्टी आकारण्यात येत होती. ही बाब परिसरातील विशेष करून मोरवड येथील जागृत शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने मोरवड गावातील जागृत शेतकऱ्यांनी याबाबत लागलीच पाठपुरावा केला. त्यांनी केदारेश्वर फायबर्स येथे जाऊन तेथील उपस्थित कर्मचाऱ्यांना भेटत तात्काळ ही (कट्टी) बंद करण्याबाबत निवेदन दिले. यावेळी केदारेश्वर फायबर्स चे मालक अमित अग्रवाल हे त्याठिकाणी उपस्थित नव्हते तेव्हा ह्या शेतकऱ्यांनी त्यांच्याशी लागलीच भ्रमणध्वनीद्वारे(व्हिडीओ कॉल) संपर्क साधत या विषयावर चर्चा केली.शेतकऱ्यांचा रोष पाहता अमित अग्रवाल यांनी लागलीच आपल्या कर्मचारी वर्गाला आदेश दिला व ही कपात (कट्टी) आज पासून तात्काळ बंद करण्यास सांगितले.यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.कारण या ठिकाणी विक्रीसाठी येणाऱ्या कापसाची आवक ही दिवसाला साधारणपणे ५०० ते ६०० क्विंटलची आहे.आहे आणि कापसाला प्रत्येक क्विंटल ६३०० ते ६५०० याप्रमाणे भाव आकारण्यात येत आहे. या भावाचा जर विचार केला तर दिवसाला ३३ हजार रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांचं होत होतं. आणि एवढ्याच रकमेचा फायदा केदारेश्वर फायबरच्या मालकाला होत होता. त्यामुळे शेतकऱ्यांची एक किलो प्रमाणे कट्टी आता वाचेल आणि त्यांना त्याचा लाभ मिळेल. याप्रसंगी केदारेश्वर फायबर्स चे मालक अमित अग्रवाल व तेथील कर्मचारी नंदू गिरासे यांनी हा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आनंदाने त्याचे स्वागत केले आहे.यावेळी अमित अग्रवाल यांच्याशी चर्चा करतांना मोरवड व चौगाव येथील शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते. त्यात रणजित चौधरी,संदिप पाडवी संतोष पाटील, शत्रुघ्न चौधरी, नरेन्द्र पाटिल, दर्शन चौधरी,दिनेश पाटील अजय पाडवी,संदीप वळवी,अमोल चौधरी , अविनाश चौधरी हे उपस्थित होते.यावेळी कपात(कट्टी) बंद केल्यानंतर पहिला लाभ हा शत्रुघ्न चौधरी यांना झाला.











