तेजस ढाकणे
ग्रामीण प्रतिनिधी, शेवगाव
शेवगाव:पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी येथील मारुती मंदिराचे पंचधातू ने बनवलेले साडेतीन लाख रुपये किमतीचे दोन कळस अज्ञात चोरटयांनी आज पहाटे चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. या संदर्भात देवस्थानचे विश्वस्त अण्णासाहेब नवनाथ दगडखैर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.शनिवारी सकाळी नऊ च्या सुमारास मंदिराचे महंत रमेशअप्पा महाराज यांना मंदिरावर लावलेल्या कळसापैकी दोन कळस गायब झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांना ही माहिती कळवली. या नंतर घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील,पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे हे फॊजफ़ाटा घेऊन घटनास्थळी हजर झाले तसेच घटनास्थळी श्वानपथक सुद्धा बोलावले मात्र उपयोग झाला नाही. सध्या मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम चालू असून त्या साठी बांबूचा पहाड उभा केला असून चोरटयांनी या बाबुंचा आधार घेत मंदिराच्या वर जाऊन नऊ व चार किलो वजनाचे दोन कळस लांबवले. घटनेची माहिती कळताच माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह हजारो भाविकांनी मंदिराकडे धाव घेतली. या घटनेने भाविकांमध्ये अस्वस्थता आहे. या पूर्वी याच पद्धतीच्या अनेक चोरी प्रकरणात हात असलेल्या मात्र सध्या जमिनीवर सुटलेल्या अल्पवयीन चोरट्यांच्या टोळीतील एका बाल चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा तपास सहायक फोजदार जगदीश मूतवार हे करत आहेत.