दिपक गोसावी
तालुका प्रतिनिधी तळोदा
तळोदा : देशभरातील रेशन कार्ड धारकांना केंद्र शासनाच्या वतीने जर ते रेशन कार्डधारक असतील आणि शासनाच्या स्वस्त दरातील धान्याचा तसेच मोफत धान्याचा लाभ घेत असतील तर त्यांच्यासाठी शिधापत्रिका ला आधार कार्ड लिंक करणे जरुरी करण्यात आले आहे.विशेष म्हणजे कोराना काळापासून शासनाकडून रेशन कार्ड धारकांना मोफत धान्य पुरविले जात आहे तसेच डिसेंबर २०२३ पर्यंत शासनाकडून लाभार्थ्यांना मोफत धान्य पुरवले जाणार आहे. मात्र शासनाच्या या योजनेचा अनेक जण चुकीच्या पद्धतीने घेत असल्याचे निदर्शनास आले आहे.अनेक लाभार्थ्यांचे दोन रेशनकार्ड आढळून आले आहेत. दोन रेशनकार्ड मध्ये नाव असलेले अनेक लाभार्थी शासनाला आढळून आले आहेत. यामुळे केंद्र शासनाने या अशा अपात्र लाभार्थ्यांवर लगाम लावण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय काही महिन्यांपूर्वीच घेतला आहे. यानुसार रेशनकार्ड धारक लोकांना आपले रेशनकार्ड आधारकार्डला लिंक करणे आवश्यक आहे. शासनाने शिधापत्रिका धारक लोकांना आपले आधारकार्ड शिधापत्रिका सोबत लिंक करण्यासाठी याआधीच ३० जून २०२३ पर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र शासनाने दिलेल्या मुदतीत अनेक लोकांनी लिंकिंग पूर्ण केलेली नाहीत. परिणामी आता शासनाने या कामासाठी मुदतवाढ दिली आहे शासनाने आता हे काम पूर्ण करण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदत दिली होती. यातही पुन्हा राहिलेल्यांसाठी पुन्हा मुदत वाढ देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी रेशनकार्ड आधारकार्डला जोडणे बंधनकारक होते. परंतू नंदुरबार जिल्ह्यातील लोकांची परिस्थिती पाहता तळोदा येथील पुरवठा विभागाकडून तहसीलदार गिरीश वखारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा अधिकारी प्रमोद डोईफोडे यांनी तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य विक्रेत्यांची बैठक घेत या बैठकीत त्यांना आपापल्या गावातील रेशनकार्ड धारकांचे स्पॉस मशीनच्या आधारे आधार लिंक करण्याबाबत सूचित करण्यात आले होते.यानंतर बऱ्याच दुकानदारांनी आपल्या स्पॉस मशीनद्वारे अनेक लाभार्थ्यांचे रेशनकार्ड आधार सोबत लिंकिंग केलेले होते. परंतु काही रेशन कार्ड लिंक करण्याचे राहिले होते अशे रेशनकार्ड लिंक करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील तांत्रिक कर्मचारी मयूर कानडे यांच्या सहकार्याने हे सर्व रेशन कार्ड आधार सोबत जोडले गेलेले आहेत. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात तळोदा तालुका हा १०० टक्के रेशनकार्ड सोबत आधार लिंक झाला आहे. त्यामुळे जर दोन रेशन कार्ड असतील तर असे रेशन कार्ड या ठिकाणी रद्द करण्यात आले आहेत.अर्थात तळोदा तालुक्यातील सर्व रेशन कार्ड तपासले गेले असून या रेशन कार्ड धारकांमध्ये कुठलेही बोगस रेशन कार्ड नसल्याचं अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात येत आहे. जिल्ह्याभरातील रेशन कार्ड धारकांची आधार लिंक बाबत आकडेवारी पाहिली तर तळोदा तालुक्यात एकूण १२७६१९ एवढे लाभार्थी असून सर्व रेशन कार्ड धारकांची आधार लिंकिंग दिनांक ९ आक्टोबर २०२३ पर्यंत पूर्ण झाली आहे. शहादा येथे २९८२९७ एवढे लाभार्थी असून आज अखेर १३५६ आधार सिडिंग प्रलंबित आहेत. तर नंदुरबार तालुक्यात २७३१७४ एवढे लाभार्थी असून आज अखेर २६७८ लाभार्थी हे आधार सिडिंग बाबत प्रलंबित आहेत. अक्कलकुवा तालुक्यात १७९३९१ लाभार्थी असून आज अखेर १७९३ लाभार्थी हे आधार सिडिंग बाबत प्रलंबित आहेत. नवापूर तालुक्यात २०२८३५ एवढे लाभार्थी असून ३७८८ लाभार्थी हे आधार सिटिंग बाबत प्रलंबित आहेत. तर आधार सीडिंग बाबत सर्वाधिक प्रलंबित लाभार्थी हे अक्रानी तालुक्यात असून त्यांची एकूण संख्या ही ४३७६ एवढी आहे.या तालुक्यात एकूण १४४५८६ एवढे लाभार्थी आहेत. जिल्हाभरात रेशन कार्ड धारकांची संख्या १२२५९०२ एवढी असून आज अखेर १४४०७ एवढे लाभार्थी आधार सिडिंग बाबत प्रलंबित आहेत.
नंदूरबार जिल्ह्याची एकूण आकडेवारी
तळोदा १२७६१९ प्रलंबित ०,
शहादा २९८२९७ प्रलंबित १३५६, नंदुरबार २७३१७४ प्रलंबित २६७८,अक्कलकुवा १७९३९१ प्रलंबित २२०९,नवापूर २०२८३५ प्रलंबित ३७८८,अक्राणी १४४५८६ प्रलंबित ४३७६.
असे एकूण १२२५९०२ एवढे लाभार्थ्यां असून प्रलंबित १४४०७ एवढे आहेत.
“आधार सिडिंग बाबत शासनाच्या वतीने निर्णय घेण्यात आला तेव्हा मी पुरवठा विभागाशी संपर्क साधत आधार सिडिंग बाबत तातडीची बैठक बोलावली.आणि सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना याबाबत सुचित केले.त्यांना सांगितले की, कुठल्याही परिस्थितीत आपल्या तालुक्यातील आधार सिडिंग १०० टक्के हे पूर्ण व्हायला हवे.जेणेकरून योग्य त्या लाभार्थ्याला या धान्याचा पुरवठा आपल्याला करता येईल. याबाबत सर्व दुकानदार यांनी तसेच पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांमुळे रेशन कार्डला आधार सिडिंग १०० टक्के पूर्ण झाली आहे. यामुळे शासनाच्या धान्याची बचत झाली आहे. आणि बोगस लाभार्थी यांचा सम्पूर्ण नायनाट झाला आहे.”
- गिरीश वखारे (तहसीलदार तळोदा जि. नंदुरबार)
“ज्या वेळेस केंद्र सरकारच्या वतीने रेशनकार्डला आधार सिडिंग बाबत निर्णय झाला त्याचवेळेस आम्ही ठरवले की, आम्हाला कुठल्याही परिस्थितीत तळोदा तालुक्यातील सर्व रेशनकार्ड आधारकार्डशी सिडिंग करायचे आहेत. आणि त्या दृष्टीने आम्ही जिल्ह्यातील तांत्रिक सहाय्यक मयूर कानडे यांच्याशी संपर्क साधत लाभार्थ्यांच्या भरवशावर न राहता स्वतः हे काम पूर्ण करून घेतले.यात दुकानदारांचेही आम्हाला मोलाचे सहकार्य लाभले.यामुळे आज तळोदा तालुक्यातील बोगस लाभार्थ्यांची संख्या ही शून्यावर आली आहे.आणि बोगस लाभार्थ्यांना जाणारे धान्य हे वाचले आहे त्यामुळे शासनाची आर्थिक बचत झाली आहे.”
- प्रमोद डोईफोडे (पुरवठा निरीक्षक तळोदा ता.तळोदा)