मोहन चव्हाण
तालुका प्रतिनिधी परळी वैजनाथ
परळी : महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघात दिलेल्या आणखीन एका महत्वपूर्ण शब्दाची पूर्तता केली असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवसृष्टी ला आता काही दिवसातच परळीकरांना प्रत्यक्ष पाहता व अनुभवता येणार आहे. ना. धनंजय मुंडे यांच्या विशेष प्रयत्नातून परळी शहरातील औद्योगिक वसाहत भागातील उपलब्ध जागेत “शिवसृष्टी” साकारण्यासाठी राज्य शासनाने परळी नगर परिषदेस 5 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. सदरच्या कामास लवकरच प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. परळी शहरात शिवसृष्टी उभारण्यात यावी अशी ईच्छा धनंजय मुंडे यांनी अनेकदा व्यक्त करून त्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. परळी शहरात शिवसृष्टी उभारण्याच्या कामास मान्यता व निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ना. धनंजय मुंडे यांच्यासह राज्य शासनाचे परळी मतदारसंघातील सकल मराठा समाजाच्या वतीने तसेच समस्त शिवप्रेमींच्या वतीने आभार मानले जात आहेत.


