आकाश बुचुंडे
ग्रामीण प्रतिनिधी मारेगाव
मारेगाव : वणी शहरातील तीन तरुण मुले मोपेड दुचाकीने वांजरी येथे गेले होते. तेथील पाण्याने तुडुंब भरलेल्या खदाणीत त्यांना पोहण्याचा मोह झाला आणि नियतीने डाव साधला. पाण्याचा अंदाज न आल्याने तिन्ही युवक बुडाले, ही खळबळजनक घटना शनिवारी दुपारी घडली. आजपहाटेपासून शोधमोहीम राबवली असता तीघांचे मृतदेह आढळले.आसीम अब्दुल सलाट शेख (16), नुमान शेख सादिर शेख (16) राहणार एकता नगर, प्रतिक संजय मडावी (16)रा. प्रगती नगर असे या तिन्ही युवकांचे नाव आहे घटनेच्या दिवशी मोपेड दुचाकी क्रमांक MH-29-Y- 5342 वरुन तीन तरुण वंजारीला गेले होते.वांजरी गावालगत चुनखडीची मोठी खदान आहे. त्यात पावसाचे पाणी साचून तलावाचे स्वरूप आले आहे. तिन्ही तरुण शनिवारी दुपारी त्या ठिकाणी पोहचले. निसर्गरम्य स्थळ असल्याने त्यांनी काहीवेळ तेथे बसून गप्पा मारल्या आणि नंतर त्यांना पोहण्याचा मोह झाला. तिघांनी आपले कपडे, चप्पल व मोबाईल दुचाकीवर ठेवून साचलेल्या पाण्यात पोहायला उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने ते तिघेही पाण्यात बुडाले. मात्र आजूबाजूला कोणीही नसल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सायंकाळी दुचाकीवर तिघांचे कपडे, चप्पल आढळून आल्याने प्रत्यक्षदर्शीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली, घटना ग्रामस्थांना कळली आणि घटनास्थळी मोठी गर्दी झाली.याप्रकरणी पोलिसांना कळविण्यात आले. ठाणेदार अजित जाधव यांनी घटनेची तीव्रता लक्षात घेत तातडीने पोलीस कर्मचाऱ्याना वांजरीला रवाना केले. तो पर्यंत शहरातील नेते मंडळी घटनास्थळी दाखल झाले होते. रात्र झाल्यामुळे शोध घेता आला नाही. रविवारी पहाटे पोलिसांनी शोधमोहीम राबवली असता तिन्ही तरुणाचे मृतदेह आढळून आले आहे पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.