संजय भोसले.
तालुका प्रतिनिधी,कणकवली.
मालवण मधील उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समिती संचलित, ओझर विद्यामंदिर कांदळगाव. या प्रशालेमध्ये “एक राखी सैनिकांसाठी “हा उपक्रम राबवून देशाच्या रक्षणासाठी सदैव तप्तर असलेल्या जवानांना विद्यार्थिनींनी पोस्टाद्वारे राख्या पाठवून सैनिकांप्रति असलेला आदर द्विगुणीत केला आहे. ओझर विद्यामंदिरच्या विद्यार्थिनींनी तयार केलेल्या राख्या भारतीय लष्कर प्रमुख अधिकारी ,लष्कर मुख्यालय, श्रीनगर विभाग जम्मू आणि काश्मीर सरकार येथे पाठविण्यात आल्या. हा उपक्रम प्रशालेमध्ये दरवर्षी राबवण्यात येतो. सैनिकांना आपण प्रत्यक्ष भेटू शकत नाही परंतु या उपक्रमातून सैनिकांना त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम आणि आदराची भावना व्यक्त करू शकतो. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देश प्रेम, राष्ट्रभक्ती, सर्वधर्मसमभाव इत्यादी भावना रुजू होण्यासाठी अशा प्रकारचे अनेक उपक्रम ओझर विद्यामंदिर मध्ये राबविण्यात येतात.” एक राखी सैनिकांसाठी” हा उपक्रम प्रशालेमध्ये राबविण्यासाठी प्रशालेचे शिक्षक प्रवीण पारकर आणि सौ एस. एस. बांदिवडेकर यांनी नियोजन करून विद्यार्थिनींना राख्या तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले. ओझर विद्यामंदिर चे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही या उपक्रमासाठी सहकार्य केले. शाळेमध्ये संस्कारक्षम उपक्रम राबवल्याबद्दल ओझर विद्यामंदिर चे मुख्याध्यापक डी .डी. जाधव यांनी उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थिनींचे आणि मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.