वैभव गुजरकर
ग्रामीण प्रतिनिधी अकोट
अकोट:- तालुका कृषी अधिकारी अकोट व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अकोट यांचे अंतर्गत कृषी सहकार व शेतकरी कल्याण विभाग नवी दिल्ली व आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF) योजना व प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांचे उन्नयन योजना (PMFME) अंतर्गत एकदिवसीय कार्यशाळा बचत भवन, पंचायत समिती, अकोट येथे शुक्रवार दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी संपन्न झाली. कार्यशाळेत डॉ.मुरली इंगळे प्रकल्प संचालक आत्मा अकोला, सुशांत शिंदे तालुका कृषी अधिकारी अकोट यांची प्रामुख उपस्थिती होती. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राहुल ठाकरे, पुरवठा व मूल्यसाखळी तज्ञ विभागीय अंमलबजावणी कक्ष स्मार्ट प्रकल्प अमरावती हे होते. प्रास्ताविकपर बोलत असताना प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे यांनी बाजार संपर्क वाढवून निव्वळ उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी माल काढणी पश्चात सुविधा निर्माण करणे सद्यस्थितीत अतिशय गरजेचे आहे म्हणून केंद्र पुरस्कृत पीएमएफएमई व कृषी पायाभूत सुविधा म्हणजेच एआयएफ या योजने अंतर्गत इच्छुक असणाऱ्या सर्व, प्राथमिक कृषी पतसंस्था, विपणन सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी गट, कृषी उद्योजक, स्टार्टअप्स व बहुउद्देशीय संस्था या सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन करत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. राहुल ठाकरे यांनी पीएमएफएमई आणि कृषी पायाभूत सुविधा एआयएफ या योजनेचे निकष, योजनेकरीता लाभार्थ्यांची पात्रता, याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करत असताना योजनेकरीता आवश्यक असलेल्या कागदपत्रांची माहिती देत अर्ज भरण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. कार्यशाळेला जिल्हा अग्रणी बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक नितीन घोरे यांचे सह तालुक्यातील सर्व बँकेचे शाखा व्यवस्थापक, वित्तीय सहाय्यक स्मार्ट प्रकल्प जवंजाळ, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, आत्मा यंत्रणेचे बिटीएम व एटीएम यांचेसह पीएमफएमई योजने अंतर्गत कार्यरत जिल्हा संसाधन व्यक्ती, आदींची उपस्थिती होती. कार्यशाळेला शेतकरी कंपन्यांचे सदस्य, शेतकरी गट, सहकारी संस्था, उमेद व माविम अंतर्गत गटांचे सीआरपी, गटांचे अध्यक्ष व सदस्य यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.कार्यशाळेचे सूत्रसंचालन व आभार अनंत देशमुख, यांनी केले.










