प्रा.सुरेश नारायणे
तालुका प्रतिनिधी, नांदगाव
नांदगाव : नांदगाव तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे, पाणी टंचाई निर्माण होवू नये यासाठी टँकरचे प्रस्ताव तयार करावें, धरणातील उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करावा, अशा सूचना आमदार सुहास आण्णा कांदे यांनी आढावा बैठकीत शासकीय अधिकाऱ्यांना दिल्या.
शासकीय विश्रागृहावरील हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे सभागृहात आज नांदगाव तालुका पाणी टंचाई आढावा बैठक घेण्यात आली.या बैठकीत आ.कांदे बोलत होते.नांदगाव तालुक्यात पाऊस कधी पडेल हे सांगता येत नाही.सद्या तालुका दुष्काळाच्या सावटाखाली ओढवला असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. पाणी टंचाई गृहीत धरून पाणी टॅन्करच्या फेऱ्या वाढवाव्यात, चारा छावण्या सुरू कराव्यात.रोजगार हमी योजनेतील मजुरांना काम मिळावे, या सारख्या उपाययोजना आखण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे. असे निर्देश आ. सुहास आण्णा कांदे यांनी दिले. बैठकीत अनेक विभागाच्या कामाचा आढावा जाणुन घेतांना खाते प्रमुखांना त्यांनी विविध सुचना केल्यात. पशुधन वाचविण्यासाठी चारा छावण्या सुरू कराव्यात. पाऊस अत्यल्प झाल्याने प्रत्येक गावात वाड्या वस्त्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात कसूर करू नका. गळती लागलेले टँकर पाठविणे किंवा वाहना नादुरुस्त झाल्यामुळे फेऱ्या कमी करणे, असे प्रकार टाळावेत. अशा सूचना आ. कांदे यांनी या बैठकीत केल्या “आमदार आपल्या दारी” या उपक्रमातून 11 हजार कुटुंबीयांना शिधापत्रिका आरोग्य शिबिरे या पातळीवर स्वखर्चाने राबविलेल्या उपक्रमातून तळागाळातल्या हजारो लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजनेचे लाभ पोहोचल्याचे आ. कांदे यांनी या बैठकीत आवर्जून सांगितले. शासकीय अधिकाऱ्यांनी देखील किमान आपल्या अधिकारात असलेल्या योजनांचा नागरिकांना लाभ द्यावा, असे त्यांनी आवाहन केले .दरम्यान 78 खेडी पाणीपुरवठा योजना पुढील सहा महिन्यात पूर्ण होईल , तसेच नांदगाव शहराला पाणीपुरवठा करणारी गिरणाधरण योजना देखील लवकरच मार्गी लागणार असल्याची ग्वाही आ.कांदे यांनी दिली.या बैठकीत पीकविमा, कृषी, महसूल, ग्रामविकास, वैद्यकीय क्षेत्र आदींचा आढावा घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्ष स्थानी असलेल्या तहसीलदार डॉ. सिध्दार्थ मोरे यांनी अधिकाऱ्यांना सूचना देतांना सांगितले की, टंचाई काळात एकत्रित काम करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे अशा सूचना केल्या. बैठकीस तहसीलदार डॉ.सिध्दार्थ मोरे, गटविकास अधिकारी गणेश चौधरी, तालुका कृषी अधिकारी आर.जी.डमाले, सहाय्यक अभियंता ज्ञानेश्वर वाटपाडे,नगरपालीका मुख्याधिकारी विवेक धांडे, पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी संतोष जगताप, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ.ख्याती तुसे,आदींसह विविध शासकीय विभागातील अधिकारी उपस्थित होते.











