कैलास खोट्टे
तालुका प्रतिनिधी संग्रामपूर
आईच्या तेराव्याचा इतर खर्च टाळून तो निधी अतिवृष्टीत नुकसान झालेल्या कुटुंबातील विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी देण्याचा स्तुत्य निर्णय बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील एका कुटूंबाने घेतला. या निर्णयाचे सध्या कौतुक होत असून समाजासमोर एक आदर्श निर्माण केल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, बुलढाणा जिल्हातील संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यात 22 जुलैला अतिवृष्टी झाली होती. यामध्ये हजारो नागरिकांची घरे वाहून गेली. पुरामध्ये अनेक कुटूंबाचा संसार उध्वस्त झाला होता. शासनाची मदत काहींना मिळाली मात्र अद्याप ही काहींना कुठलीच मदत मिळाली नाही.याच दरम्यान संग्रामपूर तालुक्यातील विठ्ठल महाले यांच्या मातोश्री यांचे निधन झाले. त्यांच्या तेरवीचा कार्यक्रम काल १६ऑगस्ट होता. तालुक्यातील विदारक चित्र पाहून विठ्ठल महाले यांनी तेरावीला जो काही खर्च करणार होते तो संपूर्ण खर्च नुकसानग्रस्तांना देण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला.


