गोविंद खरात
शहर प्रतिनिधी, अंबड
अंबड : तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने आज (ता.17) गुरुवारी अंबड तहसील कार्यालयासमोर पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्यात आली.यावेळी तहसिलदार चंद्रकांत शेळके यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाचोरा (जि.जळगांव )येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर भ्याड हल्ला केल्या प्रकरणी आ.किशोर पाटील यांच्याविरुध्द कठोर कारवाई करून राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याच्या मागणीचे निवेदनही देण्यात आले.सदर निवेदनात पत्रकारांनी म्हटले की,सत्य बातम्या देणाऱ्या पत्रकारांचा आवाज बंद करण्याच्या घटना महाराष्ट्रात सातत्यानं घडत आहेत. माध्यमांच्या प्रतिनिधींना काम करणे अशक्य झाले असून राज्यात माध्यम स्वातंत्र्यच धोक्यात आले आहे.पत्रकार संरक्षण कायदा असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ले पुन्हा वाढले आहेत.जळगांव जिल्हयातील पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांच्या गुंडांनी पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.यात संदीप महाजन हे जखमी झाले असून किशोर पाटील यांच्याकडून आपणास आणि आपल्या कुटुंबाच्या जवितास धोका असल्याची तक्रार महाजन यांनी पोलिसात केली आहे.पाटील यांच्याविरोधात पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल न करता किरकोळ गुन्हा दाखल करण्यात आला.त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आ.पाटील यांच्यावर महाजन यांच्यावरील हल्ल्या प्रकरणी कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.पत्रकार संरक्षण कायदा हा केवळ नावालाच उरला असून या कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल होत नसल्याने हल्लेखोरांची हिंमत वाढत चालली असून परिणामी पत्रकारांवरील हल्ल्यात वाढ होत आहे.त्यामुळे या कुचकामी कायद्याची यावेळी अंबड तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने होळी करून आ.किशोर पाटील यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य अशोक शहा,अंबड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष जिगे,सचिव रामभाऊ लांडे, सिद्धेश्वर उबाळे,सतिष देशपांडे,संजय कोल्हे, सोहेल चाऊस,नाजीम सय्यद,शिवाजी मस्के, फारुख शेख,अनिल भालेकर, संजय उपाध्ये, बळीराम राऊत,रफिक शेख,हरी गिराम, शोएब शेख आदींची उपस्थिती होती.