बबनराव धायतोंडे
जिल्हा प्रतिनिधी, पुणे
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाखांच्या मदतीचा धनादेश तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या उपस्थितीत आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते दि. ११ ऑगस्ट रोजी देण्यात आला.म्हसोबावाडी येथे विहिरीचा संरक्षण कठडा कोसळून मातीच्या ढिगाऱ्यखाली सापडून बेलवाडी येथील चार मजुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दिनांक २ ऑगस्ट रोजी घडली होती. त्या चार मजुरांचा मृतदेह बाहेर काढण्यात स्थानिक प्रशासन व एनडीआरएफ पथकाला ७० तासानंतर यश आले होते.सदर घटनेमध्ये इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथील सोमनाथ लक्ष्मण गायकवाड (वय ३२ वर्ष), जावेद अकबर मुलाणी (वय ३० वर्ष), परशुराम चव्हाण (वय ३० वर्ष) आणि मनोज मारुती सावंत (वय ४० वर्ष) हे मजूर मयत झाले आहेत.
माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी विधिमंडळात पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन च्या माध्यमातून या चार मयत मजुरांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळण्याकरता लक्षवेधी मांडली असता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगेचच मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येक मजुरांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये निधी देण्याची घोषणा केली होती.ती आज त्यांना देण्यात आली.


