डॉ.शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधि
परभणी.
सेलू : प्राचार्य डॉ. प्रतापराव बोराडे यांचे शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात भरीव योगदान होते. ते जीवन आनंदी कसे जगावे याचा वस्तुपाठ होते. असे प्रतिपादन डॉ. गंगाधर गळगे यांनी केले. ते शहरातील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाच्या सभागृहात ‘ एक दिवस एक पुस्तक ‘ या उपक्रमांतर्गत आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात गुरूवार ( दि. १० ) ऑगस्ट रोजी बोलत होते. कवी ना. धो. महानोर, प्राचार्य डॉ. प्रतापराव बोराडे, हरी नरके यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालय, सेलू नागरी सहकारी पतसंस्था, शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानोबा बोराडे हे होते. तर व्यासपीठावर डॉ. अशोक पाठक, कवी शरद ठाकर यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. गंगाधर गळगे यांनी शशिकला बोराडे यांनी शब्दांकन केलेले प्राचार्य डॉ. प्रतापराव बोराडे यांचे आत्मकथन ‘ मी न माझा ‘ या पुस्तकावर मनोगत व्यक्त करत त्यांच्या अनेक आठवणी सांगितल्या. जगभरात त्यांचे विद्यार्थी आहेत. अशी भावना त्यांनी व्यक्त केली.’ कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना कवी शरद ठाकर म्हणाले की, ‘ शेती, माती आणि माणसात रमणारे ना.धो. महानोर हे हिरव्या बोलीचा शब्द होते. शेती, शेतकरी, साहित्य, चित्रपट, राजकारण या क्षेत्रात ना. धो. महानोर यांनी भरीव योगदान दिले. त्यांनी ग्रामीण कवितेला प्रतिष्ठा मिळवून दिली. ना. धो. महानोर यांच्या जाण्याने मातीचा गंध लाभलेली कविता हरवली आहे. ‘ डॉ. अशोक पाठक यांनी विचारवंत, संशोधक हरी नरके यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, हरी नरके यांनी आपल्या अभ्यासपूर्ण संशोधनातून महात्मा फुले यांच्याकडे पाहाण्याची नवी दृष्टी दिली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. यासाठीचे त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे. अभिवादन कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी सुरेश हिवाळे यांनी केले. सुत्रसंचलन प्रा. अनंत मोगल यांनी केले. तर आभार प्रदर्शन स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाचे सचिव प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीते साठी ग्रंथालयाचे सहसचिव चंद्रशेखर मुळावेकर, महादेव आगजाळ, विलास शिंदे, अनिरुद्ध टाके , सुयोग साळवे यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमास मुकेश बोराडे, प्रा. प्रभाकर रावते, भाऊराव भाबट, करूणा बागले, गौतम सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.