वैभव गुजरकर
ग्रामीण प्रतिनिधी, अकोट
अकोट : शासनाकडून उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, या उपक्रमात जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या, स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धेत सहभाग घेता येईल.दहा निकषांच्या व एकूण 150 गुणांच्या आधारे निवड करण्यात येईल. त्यात पर्यावरणपूरक मूर्ती 10 गुण, पर्यावरणपूरक (थर्माकोल, प्लास्टिकविरहित) सजावट 15 गुण, ध्वनिप्रदूषणविरहित वातावरण 5 गुण, पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूलन आदी समाजप्रबोधनात्मक, सामाजिक सलोख्यासंदर्भात सजावट, देखावा 20 गुण, स्वातंत्र्य चळवळीसंदर्भात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त सजावट, देखाव्यासाठी 25 गुण आहेत. त्याचप्रमाणे, मंडळातर्फे रक्तदान शिबिर, वर्षभर गडकिल्ले संवर्धन, पर्यावरण रक्षण, सेंद्रिय शेती, सौर ऊर्जा जागृती, रूग्णवाहिका, वैद्यकीय केंद्र आदी सामाजिक कार्य 20 गुण, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक, आरोग्य आदीसंबंधी कार्य 15 गुण, महिला, ग्रामीण भागातील वंचित घटक यांच्यासाठी कार्य 15 गुण, पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम किंवा स्पर्धा 10 गुण, पारंपरिक, देशी खेळांच्या स्पर्धा 10 गुण, गणेशभक्तांना पुरविण्यात येणाऱ्या प्राथमिक सुविधा उदा. पाणी, स्वच्छतागृह, वैद्यकीय प्रथमोपचार, वाहतुकीस अडथळा येणार नाही असे आयोजन, आयोजनातील शिस्त, परिसरातील स्वच्छता आदी प्रत्येक सुविधेस 5 गुण आदी निकषानुसार गुण देण्यात येतील.
शासन निर्णयातील परिशिष्टानुसार अर्जाचा नमुना पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या mahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर ५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करणे अपेक्षित आहे. ८ सप्टेंबरपूर्वी अकादमीमार्फत जिल्हानिहाय अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयास देण्यात येतील व जिल्हास्तरीय समिती उत्सवस्थळी भेट देऊन व्हिडीओग्राफी व कागदपत्र जमा करून घेईल. जिल्हास्तरीय विजेत्यांची निवड जिल्हास्तरीय समिती करेल. त्यात उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी अध्यक्ष, जिल्हा नियोजन अधिकारी सदस्य सचिव तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, शासकीय कला महाविद्यालयातील कला प्राध्यापक, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्ह्यातील पोलिस अधिकारी हे सदस्य असतील.
जिल्हास्तरीय समितीकडून राज्य समितीकडे एका उत्कृष्ट मंडळाची शिफारस करण्यात येईल. राज्यस्तरीय पहिल्या क्रमांकास ५ लाख रुपये, द्वितीय क्रमांकास २ लाख ५० हजार रुपये आणि तृतीय क्रमांकास १ लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल. राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झालेल्या तीन मंडळांशिवाय अन्य गणेशोत्सव मंडळांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल.