माबुद खान
तालुका प्रतिनिधी जिंतूर
जिंतूर
तालुक्यातील सन २०२२ मधील अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे मंजुर अनुदान इतरत्र न हलवता जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ वाटप करावे, अशी मागणी माजी आ. विजय भांबळे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.जिंतूर तालुक्यात मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले जिंतूर तालुक्यासाठी १५ कोटी ६ लाख रुपये अनुदान मंजुर करण्यात आले. अनुदान वाटप प्रगतीपथावर असताना अचानक सदर अनुदान शासनाने इतर तालुक्यांसाठी वर्ग केले, असे निदर्शनास आल्याची चर्चा आहे. त्यामुळे जिंतूर तालुक्यातील शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत.जिंतूर तालुक्यासाठी मंजुर झालेलेअनुदान इतरत्र हलवू नये, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर माजी आ. विजय भांबळे, माजी जि. प. उपाध्यक्ष अजय चौधरी, प्रसादराव बुधवंत, विश्वनाथ राठोड, रामराव उबाळे, मुरलीधर मते, अभिनय राऊत, गणेश इलग, विठ्ठल घोगरे, शंकर जाधोव,शंकर माने, किशन मानवते, पंडित जाधव, अशोक प्रधान, अशोक काळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


