सतीश पाचपुते
तालुका प्रतिनिधी अकोले
अकोले —
जागतिक आदिवासी दिन व क्रांतीदिना निमित्त अकोले येथे क्रांतीकारकांना अभिवादना सोबतच वैचारिक मंथन सभेचेही आयोजन करण्यात येणार आहे. अकोले येथील विश्रामगृहात संपन्न झालेल्या समविचारी पक्ष व संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सर्व जाती धर्माच्या व विविध विचाराच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी करण्याची मोठी परंपरा अकोल्याला आहे. सामाजिक एकोपा व पुरोगामी विचाराला यामुळे तालुक्यात बळकटी मिळाली आहे. आता आदिवासी दिनही आदिवासी व बिगर आदिवासी जनता एकत्र साजरी करणार असल्याने तालुक्यातील एकोपा यामुळे आणखी वाढणार आहे. आदिवासी दिनानिमित्त आदिवासी समुदायाच्या कला व संस्कृतीचे संगोपन व्हावे यासाठी नाचगाणे व कला प्रदर्शनाचे कार्यक्रम तालुक्यात होत असतात. सोबत वैचारिक मंथन व क्रांतिकारकांच्या विचारांचा जागर यानिमित्ताने आयोजित करून तालुक्यातील वैचारिक प्रगल्भतेला आणखी बळकटी देण्यासाठी हा कार्यक्रम लाभदायी ठरणार आहे. अकोले येथील मध्यवर्ती प्रांगणात आदिवासी व तालुक्यातील बिगर आदिवासी क्रांतीकारकांना अभिवादन केल्यानंतर विचारमंथन सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. विचार मंथन सभेत समान नागरी कायद्याचे आदिवासींवर होणारे परिणाम, मणिपूर हिंसाचार अर्थ व अन्वयार्थ, विकास म्हणजे नक्की काय ? व आदिवासींचे मुलभूत प्रश्न कोणते ? या प्रमुख चार विषयांवर प्रथम बीज भाषणे होतील. नंतर विविध नेते, कार्यकर्ते या विषयांना मध्यवर्ती ठेवत आपले विचार व्यक्त करतील. विचार मंथन सभेत प्रा. विठ्ठल शेवाळे लिखित ‘आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे’ या पुस्तकाचे प्रकाशन केले जाईल, असे निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आले.
रानकवी तुकाराम धांडे यांनी या सभेचे अध्यक्षस्थान भूषविले. बैठकीत वसंत मनकर यांनी समन्वयकाची जबाबदारी पार पडली. डॉ. अजित नवले, डॉ. मनोज मोरे, उत्कर्षा रुपवते, मीनानाथ पांडे, स्वप्नील धांडे, एकनाथ मेंगाळ, सुनिता भांगरे, डॉ. भाऊराव उघडे, शांताराम गजे, चंद्रकांत सरोदे, नामदेव भांगरे, शिवाजी नेहे, तुळशीराम कातोरे, डॉ संदीप कडलग, शांताराम संगारे, अरुण रुपवते, दत्ता नवले, लक्षण नवले, आरिफ तांबोळी, पोपट चौधरी, लक्ष्मण आव्हाड, , प्रमोद मंडलिक, संगीता साळवे, बाळासाहेब शेटे, साईनाथ नवले आदी कार्यकर्ते उपस्थित होते. जयहिंद युवा मंच , अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती बरोबरच मधुकर तळपाडे, महेश नवले व सतीश भांगरे यांनी या उपक्रमात सहभागी होणार असल्याचे फोन करून कळविले आहे.











