रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा: व्यावसायिक, उद्योजकांचा बँकांच्या आर्थिक उलाढालीमध्ये महत्त्वाचा वाटा दिसत असला तरी, बँकाच्या विकासाचा खरा पाया हा शेतकरी व ग्रामीण भागच असून, त्यांच्या विकासा करिता बँकांनी सुद्धा अधिक क्षमतेने कार्य करणे अपेक्षित असल्याचे मत नाबार्ड अकोला जिल्ह्याचे डीडीएम श्रीराम वाघमारे यांनी व्यक्त केले.
नाबार्डच्या अकोला जिल्हा विकास कार्यालयातर्फे गुरुवारी (ता.२०), बँकांच्या राष्ट्रीयकरण दिवसाचे औचित्य साधून, ‘भारत सरकारच्या संस्थानी देशाच्या विकासामध्ये दिलेले योगदान’ या विषयावर, ‘आजादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमांतर्गत, अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना श्रीराम वाघमारे बोलत होते. कार्यक्रमावेळी मंचावर सेंट्रल बँकेचे झोनल मॅनेजर राजेश मिश्रा, एलडीएम नयन सिन्हा, अकोला डीसीसीबीचे सीईओ अनंत वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात नाबार्डच्या वतीने केलेल्या कामाचा आढावा
मांडताना, नाबार्डचे विजन, ग्रामीण भागाच्या भरभराटीसाठी प्रयत्नशील असणारी विकास बँक, असे सांगत महाराष्ट्रात २०२२-२३ या वर्षात बँकांना दिलेल्या दीर्घ कालीन कर्ज १०,५१५ कोटी, अल्पावधी कर्ज ६९८४ कोटी आणि आधारभूत सुविधासाठी राज्य सरकारला दिलेल्या ४०५३ कोटी रुपयांच्या कर्जाबद्दल श्रीराम वाघमारे यांनी माहिती दिली. नाबार्ड ने आदिवासी विकास, वाटरशेड, आर्थिक समावेशन, शेतकरी उत्पादक कंपनी उभारणी, सूक्ष्म ऋण आदी विकास कामासाठी ४३.१ कोटी रुपये ग्रँटच्या स्वरूपात दिल्याचेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमामध्ये अकोला जिल्ह्यात कार्यरत, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक, पंजाब नेशनल बँक, उत्कर्ष स्मॉल फायनांस बँक, विदर्भ कोंकण ग्रामीण बँक, आई डी बी आय बँक, डीसीबी बँक व एडीसीसी बँकेचे वरिष्ठ अधिकारी आणिप्रतिनिधी, डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन, केएसपीएम, सर्ग समिती, या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचे अध्यक्ष, संचालक व सचिव तसेच सेवा सहकारी संस्थेचे प्रतिनिधी आणि सचिव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रशांत ठाकरे यांनी केले.देशातील ९० रिजनमध्ये अकोला सेंट्रल बँक अव्वल अकोला जिल्ह्यातील सर्व बँकांनी टार्गेट पूर्ण केले व ९० रिजनमध्ये सेंट्रल बँकेने पहिले स्थान मिळवले तसेच सामाजिक सुरक्षा योजनेचे जिल्ह्याचे टार्गेट पूर्ण करून राज्यातही दुसरे स्थान राखले, याबद्दल एलडीएम नयन सिन्हा यांनी सर्व बँकांचे आभार मानले. एडी सी सी ने पीक कर्ज देण्या साठी अग्रस्थान ठेवले, त्यासाठी एडीसीसीचे सुद्धा त्यांनी आभार मानले.अकोल्यातील बँकांची एकजूट कौतूकास्पद अकोला जिल्ह्यातील सर्व बँकांची एकजूट, सहकार्याची भावना देशांतर्गत कुठेही पाहायला मिळाली नाही, असे उद्गार काढत सेंट्रल बँकेचे झोनल मॅनेजर राजेश मिश्री यांनी अकोला जिल्ह्यातील बँकांच्या कार्याचे कौतूक केले. जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी येथील शेतकऱ्यांचा विकास साधणे गरजेचे असून, शेतकरी उत्पादक कंपन्यांसोबत मार्केटिंगचे काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
नाबार्डकडून बँकेला सहकार्य अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्यांना प्राधान्य देऊन कार्यरत असून, शेती विषयक योजनांसोबतच, आर्थिक साक्षरता आणि डिजिटल बँकिंगसाठी नाबार्डकडून सहकार्य लाभत आल्याचे एडीसीसीचे सीईओ अनंत वैद्य यांनी सांगितले. गावागावांमध्ये सहकारी संस्थाना धान्य भंडारण करण्यासाठी आणि संस्थांचा बहूढंगाने व्यव साय वाढावा या दृष्टीने सरकार काम करत असल्याचे सुद्धा यावेळी त्यांनी संगीतले.











