डॉ.शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
परभणी, दि.२६ : जिल्ह्यात सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात १९ सप्टेंबर पासून सुरू होणा-या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहे. यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या ४ जुलै २०२३ च्या शासन निर्णयातील बाबींची पूर्तता करून दि. ५ सप्टेंबर २०२३ पूर्वी ऑनलाईन अर्ज करावेत,असे आवाहन नूतन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.सार्वजनिक गणेश मंडळासाठी दिला जाणारा हा पुरस्कार राज्यस्तरीय असून,प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हास्तरीय समिती असेल ही समिती पर्यावरणपूरक मूर्ती व सजावट, ध्वनी प्रदूषण रहित वातावरण, सामाजिक सलोखा संदर्भात सजावट, देखावा किंवा स्वातंत्र्याच्या चळवळी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्यभिषेक वर्षा निमित्ताने सजावट, देखावे, सामाजिक, शैक्षणिक वआरोग्य विषयक कार्य, पारंपरिक, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या स्पर्धा, क्रीडास्पर्धा, गणेश भक्तांसाठी देत असलेल्या विविध प्राथमिक सुविधा इत्यादी गुणांच्या आधारे जिल्ह्यातील एका उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची शिफारस राज्यस्तरीय स्पर्धेसाठी करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी सांगितले आहे.राज्यस्तरीय समिती ही जिल्हास्तरीय समिती मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या ४ जिल्ह्यातून प्रत्येकी ३ व अन्य जिल्ह्यातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण ४४ प्राप्त शिफारशीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामधून गुणांकन व संबंधित कागदपत्रांच्या आधारे पहिल्या ३ विजेत्यांची निवड करतील. त्यात प्रथम क्रमांकास पाच लक्ष, व्दितीय क्रमांकास २.५० लक्ष व तृतीय क्रमांकास एक लक्ष रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. उर्वरित ४१ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना राज्य शासनाकडून प्रत्येकी रुपये २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येईल.या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना सहभागी होता येईल. राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या ४ जुलै २०२३ च्या शासन निर्णयातील बाबींची पूर्तता करणारे, करु शकणारे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत सहभागी होऊ शकणार आहेत. त्यासाठी या शासन निर्णयासोबत जोडलेल्या अर्जाच्या नमुन्यात पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.pida@gmail.com या इमेलवर दि. ५ सप्टेंबर २०२३ पूर्वी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.