फैय्याज इनामदार
तालुका प्रतिनिधी जुन्नर
ओतूर : माळशेज पट्ट्यातील कल्याण-नगर हा अत्यंत महत्वाचा महामार्ग २४ तास वर्दळीचा असून महामार्गांवर मढ (ता. जुन्नर )ते माळशेज घाटापर्यंत रस्त्याला प्रचंड प्रमाणात मोठमोठे खड्डेच खड्डे पडले आहेत, पावसामुळे रस्त्याचे काम जरी रखडले असले तरी कमीत कमी खड्ड्यांवरती तात्पुरत्या स्वरूपात मुरूम टाकायला हवा होता परंतु संबंधित विभागाने तसे न केल्यामुळे गेली कित्येक महिन्यापासून हे खड्डे प्रवाशांना कमालीचे त्रासदायक ठरत असून याकडे संबधीत रस्ते बांधकाम विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे वाहनधारक चालक मालक सांगत आहेत.सदरचा महामार्गावर रस्ता दुरुस्तीचे काम चालू झाले होते परंतु हे काम अत्यंत संथ गतीने असल्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी दुरुस्त झाले नाही या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांचे पाठे तर चालकांचे मणके खिळखिळे झाले आहेत सध्या माळशेज घाटात पाऊस चालू झाल्यामुळे रस्त्याचे काम बंद झाले आहे. रस्ता प्रचंड खराब आहे तरीही टोल पठाणी वसुलीप्रमाणे सुरूच आहे. रस्ते विकसित करताना त्या रस्त्याची डागडुजी ची जबाबदारी देखील त्या ठेकेदार व टोल प्रशासनाची असते मात्र नगर कल्याण महामार्गावर टोलवसुली जोमात केली जात असून सदर रस्ता खड्यांमुळे पूर्णपणे कोमात गेल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.मराठवाडा विभागातून मुंबईकडे जाणारा हा महत्वपूर्ण महामार्ग असून हजारोंच्या संख्येतील वहाने या रस्त्यावर दिवसभर ये-जा करीत असतात, सदरच्या रस्त्याच्या देखभालीकडे गेली कित्तेक महिने जाणीवपूर्वक दुर्लक्ष व टाळाटाळ केली जात असल्याने वाहनधारकांचा संताप अनावर होऊ लागला आहे. टोल नाक्यावर पैसे प्रवास करताना हा प्रवास जीवघेणा ठरत असल्यामुळे वाहन चालक संताप व्यक्त करत आहेत.