मकरंद जाधव
तालुका प्रतिनिधी श्रीवर्धन
श्रीवर्धन : तालुक्यातील दिघी ते श्रीवर्धन या प्रवासी व अवजड वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या मार्गावरील काही ठिकाणच्या साईड पट्ट्या वाहन चालकांसाठी धोकादायक ठरत असून त्याचा नाहक मनस्ताप वाहन चालक व प्रवाशांना सोसावा लागत आहे.खाजगी मोबाईल नेटवर्क कंपनीच्या भूमिगत केबल कामासाठी ठेकेदाराकडून खोदण्यात आलेल्या साईड पट्ट्या योग्य पध्दतीने न भरल्याने त्यात पावसाचे पाणी जाऊन त्या खचत आहेत.आधीच अरुंद असलेल्या या मार्गावरील वळणावर दोन मोठी वाहने समोरासमोर आली तर एका वाहनाला बाजू देताना खचत असणाऱ्या साईडपट्टीमुळे कसरत करावी लागत आहे.रात्रीच्या वेळी वाहनचालकास साईडपट्टीचा अंदाज न आल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता असून एखादा मोठा अपघात झाल्यावर संबधित विभाग व ठेकेदार याकडे लक्ष देणार का ?असा संतप्त सवाल प्रवासी व वाहनचालकांकडून होत आहे.