भारत भालेराव
ग्रामीण प्रतिनिधी, शेवगाव
शेवगाव: आज दि १४महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंदणीकृत बांधकाम कामगारांना २८ प्रकारच्या योजना दिल्या जातात परंतु त्या प्रत्यक्षात मिळत नसल्याने जनशक्ती श्रमिक संघ शेवगाव पाथर्डीच्या वतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या प्रलंबित मागण्यासाठी शेवगाव तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढणार असल्याचे निवेदन जनशक्ती श्रमिक संघाचे संस्थापक डॉ.शिवाजीराव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज तहसीलदार प्रशांत मनोहर सांगळे यांना शेवगाव येथे देण्यात आले.निवेदनात पुढे म्हंटले आहे की, बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अस्तित्वात आहे.जनशक्ती श्रमिक संघामार्फत या मंडळाकडे शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील हजारो बांधकाम कामगारांची नोंदणी झालेली आहे. या सर्व नोंदीत बांधकाम कामगारासाठी विविध प्रकारच्या २८ योजना मंडळाने दिलेल्या आहेत. परंतु सदरील योजना फक्त कागदावरच असून प्रत्यक्षात बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळत नाहीत.त्यामुळे बांधकाम कामगारांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे जनशक्तीची मागणी आहे की, कामगारांसाठीची मध्यान्ह भोजन योजना बंद करून या मध्यान्ह भोजनाचे पैसे नोंदीत बांधकाम कामगारांच्या खात्यावर वर्ग करा. त्याचबरोबर ज्या बांधकाम कामगाराचे वय ६० वर्षे पूर्ण झाले आहे अशा बांधकाम कामगारांना ५००० रु मासिक पेन्शन योजना सुरु करावी.सर्व नोंदीत बांधकाम कामगारांना अटल ग्रामीण आवास घरकुल योजनेचा लाभ मिळावा. नोंदीत बांधकाम कामगारांना पूर्वी चालू असलेली समूह आरोग्य योजना सुरू करा.नोंदीत नाका बांधकाम कामगारांना निवाऱ्यासाठी शेडची व्यवस्था करावी.यांसह नोंदित बांधकाम कामगारासाठी विविध प्रकारच्या २८ योजना आहेत त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी. या प्रलंबित मागण्यासाठी सोमवार दि ३१.०७.२०२३ रोजी जनशक्ती श्रमिक संघ शेवगाव-पाथर्डी संघटनेच्या वतीने शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील सर्व बांधकाम कामगारांचा जनआक्रोश मोर्चा सकाळी १० ते २ या वेळेत क्रांती चौक ते तहसील कार्यालय शेवगाव असा काढणार असल्याचेही निवेदनात म्हंटले आहे.निवेदनाच्या प्रती कामगार आयुक्त मुंबई,उपायुक्त नाशिक,जिल्हाधिकारी अहमदनगर. सहाय्यक कामगार आयुक्त, अहमदनगर.पोलिस निरीक्षक, शेवगाव यांनाही देण्यात आल्या आहेत.निवेदन देतेवेळी जनशक्ती श्रमिक संघाचे मा अध्यक्ष सखाराम घावटे, नूतन अध्यक्ष संजय दुधाडे,उपाध्यक्ष भारत लांडे,सचिव अकबर शेख, संचालक राजेंद्र लोणकर,नवनाथ खेडकर,बाबासाहेब देवढे,जनशक्ती अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष आबासाहेब काकडे उपस्थित होते.