सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
पतीने दुसरा विवाह करून वाऱ्यावर सोडलेली एक महिला अगदी छोटयाशा दोन मुलांना घेवून सीमा सोनुने नावाची महिला विवेकानंद आश्रमात डोक्यावर छत व दोन वेळच्या जेवनाच्या सोयीसाठी आली. मोलमजूरी, काबाडकष्ट करून सन्मानाने व स्वाभीमानाने मुलांना लहानाचे मोठे करण्याचा निश्चय होता. मी आश्रमात झाडलोट, मुलांचे संगोपन अशी कोणतीही कामे करेल. मला काम व निवारा द्या. असे म्हणून ती आश्रमात काम करू लागली. निष्काम कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजश्रींनी दिलेला आसरा व काम करण्याची संधी या दोन्हींमुळे ही महिला आश्रमात जीवन जगत होती. गेल्या दोन महिन्यापूर्वी कर्करोगासारख्या भयंकर रोगाच्या निदानाने तीच्या पायाखालची जमीन सरकली. व उपचार सुरू करण्यापूर्वीच ता ८ जुलै रोजी तीचे कर्करोगासारख्या दुर्धर आजाराने निधन झाले. आदित्य व गायत्रीची ती एकल पालक होती. आता आईवीना ही दोन्ही मुले पोरकी झाली. या मुलांचा पूर्णपणे सांभाळ करण्याची जबाबदारी विवेकानंद आश्रमाने घेतली आहे. कोणीही नातेवाईक नसलेली व आधार नसलेली ही भावंडे आश्रमाची मुले म्हणून जगणार आहेत. त्यांना निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य या सुविधा आश्रमातर्फे मिळणार आहेत. सीमा सारख्या कौटुंबिक हिंसाचाऱ्याच्या बळी ठरलेल्या, संशयी पतीने झिडकारलेल्या, नवऱ्याच्या व्यसनाला कंटाळू जीवन वाचविणाचा प्रयत्न करणाऱ्या अनेक महिला भगिनी आपल्या मुलांचा सांभाळ करत आश्रमाच्या अनेक सेवा उपक्रमात नोकरी करीत आहेत. निष्काम कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजश्रींचा विवेकानंद आश्रम आपल्याला संरक्षण व आधार देईल. या ठिकाणी माझी प्रतिष्ठा, माझा सन्मान राखून मला स्वकष्टाने काम करून स्वतःचा उदरनिर्वाह करता येईल. हा विश्वास असलेल्या अनेक भगीनी या परिसरात होत्या आणि आहेत. आज अनेक महिलांनी आश्रमात राहून मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न व त्यांना पायावर उभे करण्याची जबाबदारी पूर्ण केली आहे. व आज कृतार्थभावाने त्या आश्रामाचे ॠण व्यक्त करतांना दिसतात. स्त्री ही अबाला नसून सबला आहे. तीला शिक्षण द्या, संरक्षण द्या व कर्तृत्व सिध्द करण्याची संधी द्या. या विवेकानंदांच्या दिव्य विचारांचा प.पू.शुकदास महाराजश्रींनी घेतलेला आदर्श म्हणजे आज आश्रमात १ हजार मुली शिक्षण घेत असून त्यातील ६५० ते ७०० मुली वसतीगृहात राहतात. पालकांनाही आपली मुलगी आश्रमात शिकते. ती नक्कीच कर्तृत्व आणि चारित्र्यसंपन्न होणार आहे हा विश्वास आहे. ‘आदित्य आणि गायत्री सारख्या असंख्य मुलांचे मायबाप झालेला विवेकानंद आश्रम हा सदैव जनसेवक व दरिद्री नारायणाची सेवा करणाऱ्या सेवकाच्या भूमिकेत राहणार आहे.’ अशी भावना आश्रमाचे अध्यक्ष व्रतस्थ संन्यासी आर. बी. मालपाणी यांनी प्रसारमाध्यमाच्या प्रतिनीधीशी बोलतांना व्यक्त केली.











