सतीश पाचपुते
तालुका प्रतिनिधी अकोले
अकोले : श्री अगस्ति एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सेक्रेटरी थोर स्वातंत्र्यसेनानी गुरुवर्य बा ह नाईकवाडी तथा बाबा यांचा जयंती उत्सव संस्थेचे पहिले विद्यालय सह्याद्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ब्राह्मणवाडा येथे संपन्न झाला. अकोले चे अध्यात्मिक क्षेत्रातील भूषण योगी केशवबाबा चौधरी यांचे अध्यक्षतेखाली व प्रसिद्ध शिवव्याख्याते गुलाबराव वळसे पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत हा सोहळा बाबांच्या स्मृतींना उजाळा देत पार पडला.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शिवव्याख्याते गुलाबराव वळसे पाटील यांनी बाबांच्या कार्याची माहिती देत दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना एका आदर्श पुरुषाने सर्वस्वाचा त्याग करत आपल्या पगारातून संस्थेच्या स्थापनेच्या दृष्टीने अत्यंत खडतर मेहनत घेऊन आज हे जे दिसते आहे ते उभे करण्यासाठी कितीतरी पायपीट करावी लागली याची कल्पना आज आपण करू शकत नाही व त्यांच्या या त्यागमय कार्याला स्मरून त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबातील सर्वांनीच विचारांची जपवणूक करत अधिक जोमाने या संस्थेचा डोलारा यशस्वीपणे पुढे नेण्यासाठी झटत आहेत. 9 विद्यालये व 3 उच्च महाविद्यालये गुणात्मक दृष्टीने वाटचाल करत असल्याने अभिमान वाटावा असे कितीतरी विद्यार्थी भारतात , परदेशात सुध्दा विविध पदांवर कार्यरत आहेत हीच बाबांची खरी देण आहे.बाबांनी सारे आयुष्य बहुजन समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी समर्पित केले मात्र कोणत्याही मोठेपणाचा बडेजाव न ठेवता देशांबरोबर समाजाचीही सेवा करणारा एक कर्मयोगी म्हणून त्यांचे कायम आपण स्मरण करण्याची आवश्यकता आहे आणि अशा एका महान व्यक्तीच्या जयंतीनिमित्त आपणांस त्यांच्या कार्याबद्दल बोलण्याची संधी मिळते आहे याबद्दल आनंद व्यक्त होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.संस्थेचे कार्याध्यक्ष सतीश नाईकवाडी यांनी प्रास्ताविकातून हे वर्ष बाबांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याचे सांगत 1966 रोजी बाबांनी संस्थेचे पहिले रोपटे सह्याद्री विद्यालय ब्राह्मणवाडा येथे लावले असल्याने 100 वी जयंती या विद्यालयात साजरी करण्याचा बहुमान त्यांना मिळाला असल्याने आनंद व्यक्त केला.योगी केशवबाबा चौधरी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बाबांचे काही प्रसंग सांगत नवीन पिढीला बाबा समजायला हवेत असे विचार मांडले.बाबांबरोबर स्नेहाचे नाते निर्माण करता आले असे आवर्जून सांगत बाबांच्या आचार आणि विचारांवर आजही संस्थेचे कामकाज चालू असल्याबद्दल समाधान व्यक्त केले . बाबांच्या जयंतीनिमित्त संस्थेच्या विविध विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा , चित्रकला स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते व त्यातील प्रथम क्रमांकाचे बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना ता समारंभात स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी देवराम गायकर( आप्पा), संस्थेच्या अध्यक्षा शैलजा पोखरकर , कार्याध्यक्ष शिरीष नाईकवाडी , सतीश नाईकवाडी ,माजी सरपंच कारभारी आरोटे, गौतम शिंदे,सरपंच सुभाष गायकर, भारत आरोटे,धोंडिभाऊ चव्हाण, संस्थेच्या विविध विद्यालयातील आजी माजी मुख्याध्यापक , सेवानिवृत्त कर्मचारी वर्ग, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.पाहुण्यांचा परिचय प्रा जनार्दन हासे यांनी करून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा चंद्रशेखर हासे , बळीराम फरगडे यांनी तर आभार प्रदर्शन अढळा विद्यालयाचे प्राचार्य सी एम सहाणे यांनी केले व कार्यक्रमाची सांगता अगस्ति विद्यालयाचे पर्यवेक्षक मंगेश खांबेकर यांच्या पसायदानाने झाली.


