सतीश पाचपुते
तालुका प्रतिनिधी अकोले
अकोले –– आज ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था स्रियांवर अवलंबून असून सावित्रीबाई फुले यांच्या त्यागातून आज मुली मोठ्या संख्येने शिक्षण घेत आहेत , पूर्वी मेरिट मधील वा पहिले आलेले विद्यार्थी हे नंतर जीवनात कुठेच अपवाद वगळता दिसले नाहीत म्हणून पुस्तकी ज्ञानाबरोबर समाजातील वास्तववादी ज्ञान आत्मसात करून समाजातील माणसे वाचावयास हवीत असे उदगार लिज्जत पापड समूहाचे कार्यकारी संचालक सुरेश कोते यांनी काढले. श्री अगस्ति एज्युकेशन सोसायटीच्या अगस्ति विद्यालयाच्या 57 व्या वर्धापन दिनानिमित्त इयत्ता 10 व 12 वी गुणवंत , 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा पात्र आणि NMMS परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगी केशवबाबा चौधरी हे होते.सुरेश कोते पुढे म्हणाले , एखाद्या संस्थेचा, शाळेचा 50 वर्षानंतर वर्धापनदिन साजरा करणे सोपी गोष्ट नाही. संस्थेचे संस्थापक गुरुवर्य बा ह नाईकवाडी तथा बाबा यांनी केलेला त्याग व महान कार्य यातून या संस्थेचा डोलारा उभा आहे म्हणून तर या विद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने शिक्षण घेताना दिसत आहेत. या विद्यालयात विविध उपक्रमाबरोबर गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असल्याने बाबांच्या नंतरही आज 57 वा वर्धापनदिन मोठ्या आनंदाने आपण साजरा करतो आहोत.संस्था चालविणे हे जिकिरीचे काम बनले असून संस्थेच्या सेक्रेटरी मातोश्री दुर्गाबाई नाईकवाडी , सतीश नाईकवाडी , शिरीष नाईकवाडी अध्यक्षा शैलजा पोखरकर या सर्वांनी अतिशय मेहनतीने हे काम पुढे नेण्यासाठी झोकून दिले आहे.संस्थेचे कार्याध्यक्ष सतीश नाईकवाडी यांनी आपल्या भाषणात विद्यालयाच्या गुणवत्तेची परंपरा कायम टिकून असल्याचे सांगत बाबांच्या अथक परिश्रमातून आणि संस्कारातून संस्था वाटचाल करते आहे असे स्पष्ट करत शिस्त आणि गुणवत्ता यात संस्थेचा लौकिक जपण्याचे काम अविरतपणे सुरू असल्याने समाधान व्यक्त केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात योगी केशवबाबा चौधरी यांनी बाबांच्या कार्याची माहिती देत मातृभूमीची सेवा करतानाच बहुजनांची शिक्षणाची सोय व्हावी , यासाठी सदैव झपाटून काम करणारे बाबा हे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आहेत.विद्यालयाने सातत्याने सर्वच बाबतीत आपली गुणवत्ता सिद्ध केली असल्याने बाबांना अपेक्षित असणारे काम तेवढ्याच ताकदीने सुरू असल्याने आनंद होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. 10 वी व 12वी गुणवंत विद्यार्थी , शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी तसेच NMMS पात्र विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले .याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष शिरीष नाईकवाडी , पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय पोखरकर ,माजी नगरसेवक प्रमोद मंडलिक, प्रा विजय भगत, सचिन शिंदे,दत्ता ताजणे , अण्णासाहेब शेटे,उपमुख्याध्यापिका सुजल गात, यांचेसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य शिवाजी धुमाळ यांनी तर सूत्रसंचालन बी एम पवार यांनी केले आणि आभार पर्यवेक्षक संजय शिंदे यांनी मानले .