कोंढवा : विहिरी पाण्याने तुडुंब भरल्या आहेत… जमीनही भुसभूशीत काळभोर आहे… मात्र, मोकाट डुकरे पिकांचे मोठ्या प्रमाणत नुकसान करत असल्याने शेतकर्यांनी ही जमीन कसणे सध्या अवघड होऊन बसले आहे. या डुकरांचा महापालिकेने तातडीने बंदोबस्त करावा; अन्यथा उपोषण करण्याचा इशारा वाडकर मळ्यातील शेतकर्यांनी दिला आहे. महंमदवाडी, तरवडेवस्ती भागातील शेतकरी शेतांमध्ये भाजीपाला व फळभाज्यांची पिके घेत आहेत. मात्र, मेहनत करून पिकविलेला भाजीपाला व फळभाज्यांचे परिसरातील मोकाट डुकरे सध्या मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. पिकांची राखण करण्यासाठी शेतकर्यांची रात्रंदिवस धडपड सुरू आहे. मात्र, वीस ते पंचवीस डुकरांच्या कळपासमोर ते हतबल ठरत आहेत. शेतातील टोमॅटो, भेंडी, फ्लॉवर, कोबी, गवारी व अन्य पिकांचा फडशा ही डुकरे पाडत आहेत. वीस ते पंचवीस किलो मक्याचे बियाणे लावलेल्या शेताची या डुकरांनी वाट लावल्याची व्यथा एका महिला शेतकर्याने व्यक्त केली.
या डुकरांनी शेतातील पिकांचे मोठे नुकसान केल्याचे अतुल तरवडे, अॅड. मच्छिंद्र वाडकर, लक्ष्मण वाडकर, प्रकाश तरवडे, हरिभाऊ वाडकर, बाळकृष्ण वाडकर, ज्ञानदेव वाडकर, विकास वाडकर, हिरामण वाडकर, संभाजी वाडकर, दिलीप वाडकर, गजानन वाडकर, नामदेव वाडकर, अनंत तरवडे, रामभाऊ तरवडे या शेतकर्यांनी सांगितले. प्रकाश तरवडे यांचा गहू या डुकरांनी उद्ध्वस्त केला. यामुळे ते संबंधित वराहपालन करणार्या व्यक्तीकडे जाऊन त्यांनी त्याला समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या व्यक्तीने दमदाटी केल्याचे तरवडे यांना सांगितले. याबाबत तरवडे यांनी पोलिसांत तक्रार केली. मात्र, वानवडी पोलिसांनी संबंधित व्यक्तीला समज देऊन परस्पर सोडून दिले. यामुळे वाडकरमळ्यातील शेतकरी आक्रमक झाले असून, महापालिका आयुक्तांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.











