अमरावती : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ४६,००० पीक विमाधारक शेतकऱ्यांपैकीं काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तुटपुंजी रक्कम जमा झाली. काही शेतकरी विम्यापासून वंचित असल्याने सरसकट पीक विमा मंजूर करावा या मागणीसाठी शिवसेनेच्या प्रकाश मारोटकर यांनी आक्रमक भूमिका घेतली. कृषी अधिकारी कार्यालयात चार तास ठिय्या देऊन शिदोरी आंदोलन छेडण्यात आले. अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तालुक्यातील मोजक्याच शेतकऱ्यांना अल्पप्रमाणात पीक विमा मिळाला. मात्र हजारो शेतकरी पीक विम्यापासून अद्याप वंचित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांनी शेकडो शेतकऱ्यांसह कृषी अधिकारी कार्यालयावर पीक वीमा संदर्भात धडक दिली. यावेळी अनेक शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित का ठेवले असा प्रश्न अधिकाऱ्यांसमोर उपस्थित करून शेतकऱ्यांसोबत कार्यालयातच ठिय्या दिला. सोबत आणलेल्या शिदोरीचे शेतकऱ्यांनी कार्यालयातच जेवण केले.
जिल्हा पीक विमा अधिकारी आल्याशिवाय कार्यालय सोडणार नाही, असा आंदोलनकर्त्यांनी निर्धार केल्याने अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. पोलिसांना पाचारण केल्याने शेतकरी व अधिकारी यांच्यातील संघर्ष टळला. अखेर जिल्हा पीक विमा अधिकाऱ्यांनी चार तासांनी हजर होऊन तालुक्यातील कोणत्याही शेतकऱ्याला पीक विम्यापासून वंचित ठेवणार नाही असे लेखी पत्र दिले. त्यांनतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी माजी सरपंच श्रीकृष्ण सोळंके, मधुकर कोठाळे, विलास सावदे, प्रमोद ठाकरे, रवी ठाकूर, दिनेश पकडे, लीलाधर चौधरी, गोपाळ डोफे, रमाकांत मुरादे, राजू राऊत, प्रकाश इखार, धनु मेटकर, भूषण मोरे, ज्ञानेश्वर लांजेवार, कमलेश मारोटकर, मंगेश दांडगे, हरिदास लीचडे, मनदेव चव्हाण, भावेश भांबुरकर, मनोज ढोके, प्रतीक रिठे, पवन खेडकर, अक्षय राणे, अक्षय काकडे, अजय काळे, परवेज अली, दिनेश रघुते, अनिकेत मोरे, विक्की बविस्थळे, सतीश मोरे, नागोराव रावेकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.