औरंगाबाद : सुमारे ४० कोटी रुपये खर्चून बांधलेल्या वंदे मातरम सभागृहाचे उद्घाटन डिसेंबरच्या दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यात करण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वेळ घेण्याचे प्रयत्न होत आहेत. या सोहळ्याला राजकीय रंग देण्यासाठी एक मंत्री अग्रेसर आहेत. १९८५-८६मध्ये या सभागृहाची घोषणा झाली होती. त्यानंतर शिवसेनेने वारंवार आंदोलने केली. तेव्हा मुस्लिम मतांचा विचार करून २०१३ मध्ये काँग्रेस सरकारने वंदे मातरमसोबत हज हाऊसचा निर्णय घेतला. पण वेळेवर निधी दिला नाही. त्यामुळे अत्यंत कासवगतीने बांधकाम होऊन सप्टेंबर २०२२ मध्ये वंदे मातरम तयार झाले. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांच्याच हस्ते स्वतंत्रपणे उद्घाटन होईल, असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितल्याने उद्घाटन सोहळा थांबला. याविषयी १३ नोव्हेंबर रोजी दिव्य मराठीने वृत्त प्रसिद्ध केल्यावर शासकीय यंत्रणेत धावपळ उडाली आणि डिसेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात मुख्यमंत्री आणि किमान ५ मंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन करावे, असे नियोजन होत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. वंदे मातरमनंतर महिनाभरात हज हाऊसचा लोकार्पण सोहळा होऊ शकतो, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.