धुळे : मालेगाव कडून साक्रीकडे येणाऱ्या लग्नाच्या वऱ्हाडाच्या बसला झालेल्या अपघातात 13 जण जखमी झाल्याची घटना आज घडली आहे. शाळेच्या बसमध्ये हे वऱ्हाड साक्रीत येत असताना भडगाव बारी मध्ये ही बस उलटून हा अपघात झाला. या अपघातात एका महिलेसह एका बालिकेची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती देण्यात आली आहे. मालेगाव तालुक्यातील चिंचवे येथील वधूचा विवाह साक्रीत येथील राजे मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी मालेगाव तालुक्यातीलच एका शाळेच्या बसमध्ये मुलीकडील वऱ्हाड लग्नासाठी येण्यास निघाले. ही गाडी भडगाव वारीमध्ये आली असता एम एच 41 ए जी 98 0 5 या क्रमांकाच्या बसला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 13 जण जखमी झाले आहेत.
जखमींमध्ये मिराबाई बोरसे (वय 40), मयुरी बोरसे (वय 12), निकिता सावळे (वय 25 ),चित्रा सावळे (वय 55), सुवर्णा सावळे (वय 40), रवीना समाधान सावळे( वय 21), गायत्री सावळे (वय १३), बापू सावळे (वय 60), ललित खैरनार (वय 10 ), सरिता खैरनार (वय 30), लावण्या चव्हाण (वय 9), रेखा सावळे (वय 30), मकाबाई ह्याळीज (वय 60) आणि कुसुम अहिरे (वय 45) यांचा समावेश आहे. यातील सरिता खैरनार आणि लावण्या चव्हाण या दोघांची प्रकृती अत्यवस्थ असून त्यांना उपचारासाठी मालेगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान या अपघाताची माहिती कळाल्याने साक्री पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे हे तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत. त्याचप्रमाणे साक्री पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.